जळगाव लाईव्ह न्यूज । ३ मे २०२४ । महाविकास आघाडीचे रावेर लोकसभेतील उमेदवार श्रीराम पाटील यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आज जळगावात असून त्यांची चोपडा येथे सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी संबोधित करताना शरद पवार यांनी महागाईवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. महागाई किती वाढली आहे. मला सत्ता द्या असे त्यांनी दहा वर्षापूर्वी सांगितले होते. पन्नास दिवसात महागाई कमी करणार असल्याचं सांगितलं होते. मात्र दहा वर्षात महागाई कमी नाही झाली तर वाढली आहे, अशी टीका शरद पवार केली आहे.
दोन कोटी रोजगार देणार असल्याच सांगत होते. आज काय परिस्थिती आहे. रोजगाराचा प्रश्न गंभीर आहे. दोन कोटीची केवळ घोषणा होती. मोदी साहेब केवळ घोषणाच करतात. सत्ता देशाच्या हितासाठी असायला पाहिजे असंही शरद पवार म्हणाले. आज देशात अनेक प्रश्न आहेत. त्याची चिंता लोकांना आहे. दहा वर्षात मोदी यांच्या हातात सत्ता आहे. मत मांडायचा त्यांना अधिकार आहे. पण ते सत्यावर आधारित असले पाहिजे. पण तसे किती दिसत आहे याचा विचार केला पाहिजे.
जळगाव जिल्हा हा देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढा देणारा जिल्हा असून महात्मा गांधी यांनी जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी चळवळ उभी केली होती. पहिले काँग्रेसचे अधिवेशन फैजपूरमध्ये झाले होते. देशासाठी काम करताना कोणती तमा बाळगली नाही, असे नेते या ठिकाणी होते. महाराष्ट्राची विधानसभा किती उत्तमरित्या चालविता येते हे अरुणभाई गुजराती यांनी दाखवून दिले होते. जनतेची सेवा केली पाहिजे या जिल्ह्यातून विविध क्षेत्रात पाहायला मिळाले आहे. विधायक कामाचा पुरस्कार करणारा जिल्हा आहे. निवडणुका येतात जातात, पण जनतेच्या समस्या काय त्या कशा सोडवायला हव्या ते पाहायला पाहिजे. आज काय चित्र दिसत आहे? लोकांनी श्रीराम पाटील यांच्यासारखा काम करण्याची इच्छा असणार नवखा उमेदवाराला साथ द्यायला पाहिजे, असं शरद पवार म्हणाले.
पंतप्रधान मोदी आमच्यावरही टीका करत आहेत. मोदी साहेब केवळ टीका टिप्पणी करून आपल्या पदाची गरिमा कमी करत आहेत. दिल्लीत शेतकऱ्यांनी आंदोलन केले. मात्र मोदी यांना त्यांचे प्रश्न काय आहे? हे समजून घ्यावे, असे वाटले नाही. म्हणून आज शेतीची ही अवस्था झाली आहे.असंही शरद पवार म्हणाले.