जळगाव लाईव्ह न्यूज । ३० एप्रिल २०२४ । यंदाच्या मे आणि जून महिन्याच्या सुरुवातीला विवाह मुहूर्त नसल्याने अनेकांनी एप्रिलमध्येच लग्नाचा बार उडवून टाकला. आगामी दोन दिवसानंतर ३ मे ते ११ जूनपर्यंत एकही विवाह मुहूर्त नसल्यामुळे नुकतेच लग्न जुळलेल्या वधू-वरांना मुहूर्तासाठी प्रतिक्षा करावी लागणार आहे.
खरंतर मे आणि जून मध्ये विवाह सोहळे मोठ्या प्रमाणत पार पडतात. यंदा मात्र मे-जूनमध्ये गुरू आणि शुक्र या दोन्ही ग्रहांचा एकत्रित अस्त असल्याने या काळात मंगलकार्य करू नये, असे शास्त्र वचन आहे. दोघांचा एकत्रित अस्त असल्याने मेमध्ये मुहूर्त कमी आहेत. तब्बल २३ वर्षांनंतर हे घडत आहे. यापूर्वी 2000 मध्येही अशीच परिस्थिती निर्माण झाली होती.
लग्नसराईत यंदा विवाहासाठी एप्रिलपासून डिसेंबरपर्यंत ६५ मुहूर्त आहेत. ३ मे ते ११ जूनपर्यंत एकही विवाह मुहूर्त नाहीय. मे महिन्यात दोन तर जून महिन्यात एकूण सात मुहूर्त आहेत. मात्र, मुहूर्त न काढल्याने त्यांची मोठी फजिती होत आहे, तर काही कुटुंब मुहूर्त न बघताच लग्नकार्य आटोपण्याच्या मनस्थितीत आहेत. मेमध्ये फारसे मुहूर्त नसल्याने ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांनी मुलांचे लग्न एप्रिलमध्येच आटोपून घेतली आहेत.
जुलैपर्यंत असे आहेत विवाह मुहूर्त
मे : १, २
जून : १३, १६, १८, २४, २५, २६, २८
जुलै : १९, २१, २२, २३, २६, २७, २८, ३१