जळगाव लाईव्ह न्यूज । २८ एप्रिल २०२४ । भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची 15वी यादी जाहीर केली असून त्यात उत्तर मध्य मुंबईमधील विद्यमान खासदार पूनम महाजन यांच्या जागी ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांना उमेदवारी जाहीर केली. यामुळे आता उत्तर मध्य मुंबईमध्ये काँग्रेसच्या वर्षा गायकवाड विरुद्ध उज्वल निकम अशी लढत निश्चित झाली आहे. दरम्यान, उज्ज्वल निकम यांच्या उमेदवारीवर त्यांचे पुतणे तथा भाजपचे जळगाव जिल्हा उपाध्यक्ष रोहित निकम यांनी पहिली प्रतिक्रिया दिली.
काय म्हणाले रोहित निकम?
गेल्या काळात एकनाथ शिंदे यांनी रोहित निकम यांची भेट घेतली होती. मात्रस त्यावेळी राजकीय कुठलीही चर्चा झाली नव्हती. रोहित म्हणाले, की काका राजकारणात येतील असं कोणालाही वाटत नव्हतं, मात्र त्यांच्या उमेदवारीमुळे कुटुंबात नक्कीच आनंद आहे. मी लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, आता माझे काका उज्वल निकम यांना उमेदवारी मिळाल्यामुळे नक्कीच त्याचा मला आनंद वाटतोय.
तुमच्या कुटुंबात राजकीयदृष्ट्या विचार केला तर उज्वल निकम यांचे वडील बॅरिस्टर देवराव निकम हे चोपडा तालुक्यातून आमदार होते. काँग्रेस पक्षाकडून ते आमदार झाले होते. त्यानंतर उज्वल निकम यांच्या वहिनी या जिल्हा परिषदेच्या सदस्या होत्या. निकम कुटुंबात पहिल्यांदाच उज्वल निकम यांच्या माध्यमातून लोकसभा निवडणूक लढवली जाणार आहे. ज्या पद्धतीने उज्वल निकम यांनी न्यायालयात आपली कामगिरी गाजवली. त्याच पद्धतीने ते खासदार म्हणून सुद्धा उत्कृष्ट कामगिरी करतील, असा विश्वास रोहित निकम यांनी व्यक्त केली.