जळगाव लाईव्ह न्यूज । २७ एप्रिल २०२४ । भाजपनं गेल्या निवडणुकीत जिंकलेल्या सर्व जागांवर उमेदवार जाहीर केले. पण उत्तर मध्य मुंबईत भाजपनं अद्याप उमेदवार दिला नव्हता. त्यामुळे येथून कोणाला उमेदवारी मिळेल याकडे लक्ष लागले होते. अशातच भाजपने प्रसिद्ध वकील उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघात काँग्रेसने वर्षा गायकवाड यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे आता या दोघांचा एकमेकांशी सामना होणार आहे.
भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीनं लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पंधरावी यादी जाहीर केली आहे. यात भाजपने मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातून ज्येष्ठ विधीज्ञ उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिली आहे. भाजपकडून स्वर्गीय प्रमोद महाजन यांच्या कन्या पूनम महाजन यांना पुन्हा एकदा उमेदवारी दिली जाईल असं सांगितलं जात होतं. गेल्या काही महिन्यांपासून पूनम महाजन या मतदारसंघात सक्रियही झाल्या होत्या. पण त्यांचं तिकीट अचानक कापण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
कोण आहेत निकम?
उज्जवल निकम हे विशेष सरकारी वकील आहेत. निकम हे मूळचे जळगावचे आहेत. त्यांचे वडील देवरावजी निकम हे न्यायाधीश होते. आई गृहिणी होती. बीएससी झाल्यानंतर उज्ज्वल निकम यांनीही जळगावमधून कायद्याची पदवी घेतली. तिथल्या जिल्हा न्यायालयातून त्यांनी वकिलीला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी राज्य स्तरावरील केसेस लढण्यास सुरुवात केली आणि नंतर राष्ट्रीय स्तरावरील केसेसही हाताळण्यास सुरुवात केली.