जळगाव लाईव्ह न्यूज । २६ एप्रिल २०२४ । राज्यासह जळगाव जिल्ह्यात उन्हाचा पारा चांगलाच वाढला आहे. असह्य उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले. यातच वाढत्या तापमानामुळे रावेर, यावल, मुक्ताईनगर, चोपडा आदी ठिकाणच्या केळी बागा धोक्यात आल्या आहेत. याचबरोबर दरही कमी मिळत असल्याने शेतकरी वर्ग हैराण झाला आहे.
संपूर्ण जिल्हाभरात एप्रिलमध्येच सूर्य आग ओकू लागल्याने केळी बागांवर तापमानाचा विपरीत परिणाम होत आहे. दुसरीकडे ऐन केळी कापणीच्या हंगामात व्यापारी बोर्डावरील भावापेक्षा कमी भावाने मालाची मागणी करीत असल्याने केळी उत्पादकांना दुहेरी फटका सहन करावा लागत आहे.
केळी हे नाशवंत फळ आहे. ते केळी बागेत अथवा स्टोरेजमध्येही जास्त काळ ठेवता येत नाही, अशातच मोठ्या प्रमाणावर केळी कापणीवर आली असताना ४१ ते ४३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद होत असल्याने काही भागात अति उष्णतेमुळे केळी मान टाकत असल्याने केळी उत्पादकांचे मोठे नुकसान होत आहे. केळी वाचवण्यासाठी उत्पादक धडपड करीत आहेत. सध्या जो माल बागांमध्ये तयार आहे, तो व्यापाऱ्यांनी कापून न्यावा, यासाठी शेतकरी प्रयत्नशील आहेत. व्यापारी कमी दराने केळी मागत असल्याने एकरी १ लाख रुपये खर्च करणाऱ्या केळी उत्पादकांना मोठी घट सोसावी लागत आहे.
महागडे बेणे, ठिंबक सिंचन, वीज बिल, मोठ्या प्रमाणात वाढलेल्या रासायनिक व जैविक खताच्या किमती तसेच मजुरीचा खर्च करूनही योग्य दर मिळत नसल्याने शेतकरी कर्जाच्या खाईत जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
बोर्डावरील भाव मिळण्यासाठी पावले उचलावी!
केळीला शासन हमी भाव देऊ शकत नसला तरी किमान आपल्या माध्यमातून कृषी उत्पन्न बाजार समितीत काढण्यात येणारा म्हणजेच बोर्डावरील भाव तरी उत्पादकांना मिळवून द्यावा, अशी अपेक्षा केळी उत्पादक करीत आहेत. लायसन्सधारक व्यापाऱ्यांची बैठक घेऊन याबाबत योग्य ती उपाययोजना करावी, अशीही मागणी होत आहे.