जळगाव लाईव्ह न्यूज । २५ एप्रिल २०२४ । बॉलिवूड अभिनेत्री तमन्ना भाटियाच्या अडचणी वाढवणारी एक बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र सायबर सेलने तमन्ना भाटियाला समन्स बजावले आहे. तमन्नाने २०२३ मध्ये आयपीएलचा सामना फेअरप्ले अॅपवर (Fairplay App) लाईव्ह स्ट्रीम केले होते. यामुळे व्हायाकॉम कंपनीला कोट्यवधींचं नुकसान झाले होते. याप्रकरणी अभिनेत्रीला येत्या २९ एप्रिलला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिलेले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, तमन्ना भाटियाने फेअरप्लेची जाहिरात केली होती, त्यामुळे तिला साक्षीदार म्हणून चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. सायबर पोलिसांना अभिनेत्रीकडून हे समजून घ्यायचंय की तिला जाहिरात करण्यासाठी तिच्यासोबत कोणी संपर्क साधला होता?, तिला ही जाहिरात कशी मिळाली ?, या जाहिरातीसाठी अभिनेत्रीला किती मानधन मिळाले ? यासाठी अभिनेत्रीला महाराष्ट्र सायबर सेलने चौकशीसाठी बोलवले आहे.
वायकॉमने दिलेल्या तक्रारीनुसार, फेअरप्ले अॅपने टाटा आयपीएल (Indian Premier League) २०२३ चे अनधिकृतरित्या स्क्रीनिंग केले होते. त्यामुळे वायकॉमला तब्बल १०० कोटी रुपयांचे नुकसान झाले होते. तसेच या प्रकरणी, महाराष्ट्र सायबर सेलने रॅपर बादशाहचाही जबाब नोंदवला आहे.
दरम्यान, या प्रकरणामध्येच बॉलिवूड अभिनेता संजय दत्तलाही महाराष्ट्र सायबर सेलने मंगळवारी (२३ एप्रिल) चौकशीसाठी बोलावले होते. मात्र संजय दत्त मंगळवारी चौकशीला हजर झाला नाही. मात्र, संजय दत्तने चौकशीसाठी आणखी वेळ मागितला आहे.