मतदानाचा अधिकार सर्वांनी बजवावा ; जिल्हाधिकाऱ्यांचे MY FM द्वारे मतदारांना आवाहन
जळगाव लाईव्ह न्यूज । ४ एप्रिल २०२४ । लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर मतदानाची टक्केवारी वाढावी या दृष्टीने जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदार संघातील जास्तीत जास्त नागरिकांनी आपला मतदानाचा अमूल्य अधिकार बजवावा व लोकशाही बळकट करावी असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी माय एफ. एम 94.3 द्वारे केले.
गुरुवार दिनांक 4 एप्रिल रोजी माय एफ. एम 94.3 या रेडिओ वहिनीवर आर.जे. देवा यांनी मतदान प्रक्रियेविषयी आयुष प्रसाद यांच्याशी संवाद साधला. यावेळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले की, अठरा वर्षावरील तरुण-तरुणींना पहिल्यांदाच मतदानाचा अनुभव घेता येणार आहे. जळगाव जिल्ह्यातील रावेर व जळगाव लोकसभा मतदारसंघातील मतदान केंद्रांवर सुसज्ज अशा सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. दिव्यांगांसाठी व्हीलचेअर, मतदानासाठी येणाऱ्या महिलांसोबत असलेल्या बालकांसाठी बालसंगोपन केंद्र, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहांची सुविधा मतदान केंद्रांवर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
मतदान करायला काही सेकंद लागतात. व आपल्या एका मताने लोकशाही अधिकाधिक मजबूत होत जात असल्याने जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाने जबाबदारीने आपला हक्क बजवावा असे आवाहनही जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले. ई व्ही एम हे अत्यंत सुरक्षित असून कोणीही ईव्हीएम बाबत शंका घेऊ नये. मतदानाबाबत काही अडचण असल्यास 1950 या हेल्पलाइन द्वारे आपण आपली अडचण दूर करू शकतात. आचारसंहिता भंग किंवा निवडणूक प्रक्रिये दरम्यान काही चुकीचे घडत असल्याची शंका आल्यास c vigil ॲप द्वारे देखील आपण प्रशासनाकडे तक्रारी नोंदवू शकतात. मतदान ओळखपत्रासोबतच 12 प्रकारचे पुरावे मतदानासाठी ग्राह्य धरले जाणार आहेत. त्यामुळे 13 मे रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा या कालावधीत नागरिकांनी अधिकाधिक प्रमाणात मतदान प्रक्रियेत सहभाग नोंदवावा असे आवाहनही यावेळी आयुष प्रसाद यांनी केले.