गाड्यांचे सायलेन्सर चोरी करणारी टोळी जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात
जळगाव लाईव्ह न्यूज । २८ मार्च २०२४ । जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मारुती सुझुकी कंपनीच्या इको गाडीचे सायलेन्सर चोरी करणाऱ्या टोळीच्या अमळनेर शहरातून मुसक्या आवळल्या आहेत. तिघांनी पाच गुन्ह्याची कबुली दिली असून तिघांना पुढील कारवाईसाठी अमळनेर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
अमळनेर शहरात वेगवेगळ्या भागात जाऊन मारुती सुझुकी कंपनीचे ईको गाडीचे सायलेन्सर चोरी केल्याच्या घटना घडल्या होत्या. या संदर्भात अमळनेर पोलीस ठाण्यात वेगवेगळे पाच गुन्हे दाखल करण्यात आले होते. या गुन्ह्यांचा उलगडा करण्यासाठी पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी आदेश दिले होते. दरम्यान ही चोरी संशयित आरोपी मनीष उर्फ सनी महाजन आणि त्याचे साथीदार हे सायलेन्सर चोरी करत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार जळगाव येथील स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांनी पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील पोलीस हेडकॉन्स्टेबल संदीप पाटील कमलाकर बागुल प्रवीण मांडोळे गोरख बागुल राहुल बैसाणे अशोक पाटील यांनी बुधवार २७ मार्च रोजी दुपारी १२ वाजता अमळनेर येथे जाऊन संशयित आरोपी मनीष उर्फ सनी रविंद्र महाजन, शरद उर्फ टकल्या दिलीप पाटील आणि निखिल संतोष चौधरी तिघे रा. अमळनेर यांना अटक केली. त्यांचा अजून एक साथीदार प्रशांत रघुनाथ चौधरी रा. अमळनेर हा सध्या नाशिक जेलमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले. ताब्यात घेतलेल्या तीनही संशयितांची चौकशी केली असता त्यांनी अमळनेर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या पाचही गुन्ह्यांची कबुली दिली आहे. तसेच त्यांच्याकडून चोरीची दुचाकी हस्तगत केली आहे. ही दुचाकी नाशिक जिल्ह्यातील आडगाव पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यातील असल्याचे समोर आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तिघांना पुढील कारवाईसाठी अमळनेर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.