जळगाव लाईव्ह न्यूज । २५ मार्च २०२४ । राज्यासह जळगाव जिल्ह्यात तापमानात वाढ झाल्याने उन्हाचा झळा बसत आहे. सलग दुसऱ्या दिवशी जिल्ह्यातील भुसावळ येथील तापमान ४० अंशावर नोंदविले गेले. पारा चाळिशी पार झाल्याने शहरवासीय उकाड्याने हैराण झाले. दरम्यान, गतवर्षाच्या तुलनेत तापमान अधिक असल्याचे दिसून येते.
यंदा अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरण व सोसाट्याचा वारा यामुळे मार्च महिन्याच्या सुरवातीचे काही आठवडे तापमान सुसह्य गेले. यानंतर तापमानात वाढ झाली. रविवारी भुसावळचे तापमान ४०.६ अंश सेल्सिअस इतके होते. दरम्यान, उकाड्यात वाढ झाल्याने घामाच्या धारा वाहू लागल्या आहेत.
वाढत्या तापमानामुळे दुपारी तर संपूर्ण बाजारपेठ, वर्दळीच्या रस्त्यावरील वाहतूक मंदावली होती. आकाश सकाळपासूनच निरभ्र होते. दरम्यान, आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार पुढील आठवड्यात कमाल तापमानात आणखी वाढ होईल, असा अंदाज व्यक्त केला आहे.
शीतपेयांना वाढती मागणी
खऱ्या अर्थाने उन्हाळ्याचा चटका मार्चच्या अखेरीत जाणवू लागला आहे. दोन दिवसांपासून पारा ३७ अंशांवर पोहोचल्याने नागरिक हैराण झाले आहेत. उन्हाळ्याच्या झळा जाणवत असून, उन्हामुळे दिवसा घराबाहेर जाणे नागरिक टाळत आहेत. रस्ते निर्मनुष्य दिसत आहेत. वाढत्या उन्हामुळे गॉगल, टोप्या, रूमाल, शीतपेय आदींची मागणी वाढली आहे