जळगाव लाईव्ह न्यूज । 26 फेब्रुवारी 2024 | देशासह राज्यातील वातावरणात पुन्हा बदल झाला. मागील काही दिवसापासून थंडी गायब होऊन उन्हाचा चटका वाढला होता. यानंतर आता राज्यात अस्मानी संकट आले. रब्बी हंगाम काढण्याची वेळ असताना राज्यातील काही भागात गारपीट आणि पाऊस पडण्याचा अंदाज मुंबई हवामान विभागाने व्यक्त केला आहे. हवामान विभागाने आजपासून तीन दिवस राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट दिला आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
या जिल्ह्यांना अलर्ट जारी
विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये आज हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. २६ फेब्रुवारी रोजी नांदेड, हिंगोली, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यास यलो अलर्ट दिला आहे. नागपूरला ऑरेंज अलर्ट दिला आहे. २७ फेब्रुवारी रोजी वर्धा, अमरावती, नागपूर, गोंदिया, भंडारा जिल्ह्यास ऑरेंज अलर्ट दिला आहे. वाशिम, अकोला, यवतामाळ, बुलढाणा, परभणी, नांदेड, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यास यलो अलर्ट २७ फेब्रुवारी रोजी दिला आहे. २८ फेब्रुवारी रोजी अमरावती, नागपूर, गोंदिया, भंडारा या जिल्ह्यात यलो अलर्ट दिला आहे.
जळगावात कशी राहणार स्थिती?
दरम्यान, उत्तर व पश्चिम भारतात होत असलेल्या नियमित हवामानातील बदलामुळे पश्चिमी विक्षोभाची (वेस्टर्न डिस्टर्बन्स) स्थिती निर्माण झालेली आहे. यामुळे गेल्या काही दिवसापासून वातावरणात बदल झाला असून, सकाळी थंडी तर दुपारी कडक उन्हें नागरिकांना अनुभवायला मिळत आहे. रविवारी पहाटे जळगाव जिल्ह्याचा पारा १२ अंशांवर घसरला. शुक्रवारी तो १४ अंशांवर होता. दुसरीकडे आज सोमवारी जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. जिल्ह्यातील काही भागात दुपार ते सायंकाळपर्यंत बेमोसमी पावसाची शक्यता आहे.