जळगाव लाईव्ह न्यूज । 11 फेब्रुवारी 2024 । फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीलाच राज्यातील अनेक भागात कमाल तापमानात वाढ झाल्याने थंडी गायब होऊन उन्हाचा झळा बसत आहेत. त्यातच हवामान खात्याने महाराष्ट्रातील विदर्भ आणि मराठवाड्यात पुढील दोन दिवसांत अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवला होता. हवामान खात्याचा हा अंदाज तंतोतंत खरा ठरला असून मराठवाड्यातील काही भागात पावसाच्या सरी कोसळल्या. तर विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मोठी गारपीट देखील झाली. यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाल्याचं पाहायला मिळालं.
सध्या हिवाळा संपला नसून यापूर्वीच राज्यातील तापमानात वाढ होऊ लागली. यामुळे थंडी गायब होऊन दुपारी उन्हाचे चटके बसत आहे. या हवामान बदलाचा शेतकऱ्यांच्या पिकांना फटका बसत आहे. यातच अवकाळी पावसाचे सावट असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. शनिवारी विदर्भातील, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर परिसरात हा पाऊस झाला. वर्धा जिल्ह्यातील देवळी शनिवारी दुपारी तुफान गारपीट झाली. यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे अतोनात नुकसान झाले.
आज या जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा
दरम्यान, आजपासून पुढील दोन ते तीन दिवस राज्यात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. जळगाव, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, बीड, नांदेड, लातूर या भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे.
याशिवाय विदर्भातील काही भागात देखील हलक्या स्वरुपाचाच पाऊस पडण्याचा अंदाज आहे. अकोला, अमरावती, वर्धा तसेच नागपुरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होईल, असंही हवामान खात्याने सांगितलं आहे. शेतकऱ्यांनी रबी हंगामातील पिकांची काळजी घ्यावी, असा सल्लाही देण्यात आला आहे.