जळगाव लाईव्ह न्यूज : 29 जानेवारी 2024 : यंदा पाऊस कमी झाल्यामुळे रब्बी – पिकांवर परिणाम होईल, अशी स्थिती होती. मात्र, नोव्हेंबर अखेरीला जळगाव जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांना काही प्रमाणात फायदा झाला आहे. रब्बी हंगामातील धान्य खरेदीला सुरुवात झाली असून, जळगाव बाजार समितीत हरभऱ्याला पहिल्याच दिवशी ५,८०० रुपयांचा भाव मिळाला आहे.
विशेष म्हणजे हमीभावापेक्षाही हरभऱ्याला ३६० रुपयांचा जास्तीचा भाव मिळाला आहे. हरभऱ्याला हमीभाव ५ हजार ४४० रुपये एवढा आहे. मात्र, त्यापेक्षा जास्तीचा भाव बाजार समितीमध्ये मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये काहीसे आनंदाचे वातावरण आहे.
तर तुरीच्या दरातदेखील वाढ झाली. तुरीच्या दरात 200 रुपयाची वाढ झाली असून यामुळे आता जळगाव बाजार समितीत तुरीचे दर ९ हजार ७०० रुपयांवर पोहचले आहेत.
नवीन तूर बाजारात दाखल होत असून, त्याचप्रमाणे तुरीच्या दरातही वाढ होत आहे. गेल्या आठवड्यापर्यंत ९ हजार रुपयांवर आलेले तुरीचे दर आता ९,७०० रुपयांवर पोहचले आहेत. तुरीची आवकदेखील बाजार समितीमध्ये चांगली सुरू असून, भाव तगडा मिळत आहे. तुरीला ७ हजार रुपयांचा हमीभाव आहे. मात्र, हमीभावापेक्षा तब्बल २,७०० रुपयांचा अधिकचा दर शेतकऱ्यांना मिळत आहे. आगामी महिनाभरात भावात काही प्रमाणात चढ उतार होऊ शकतात.