जळगाव लाईव्ह न्यूज | 28 जानेवारी 2024 | गेल्या काही दिवसापूर्वी निलंबित करण्यात आल्याच्या कारवाईनंतर माजी खासदार उल्हास पाटील (Ulhas patil) यांनी कन्या डॉ. केतकी पाटीलसह भाजपात प्रवेश केला. यामुळे जळगाव जिल्ह्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला. यांनतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे NCP (शरद पवार गट) नेते संजय गरुड (Sanjay Garud) यांनी सुद्धा भारतीय जनता पक्षात (BJP) प्रवेशाचा निर्णय घेतला. यामुळे जिल्ह्यातील राजकारणात आणखी एक भूकंप होणार आहे.
आगामी लोकसभा तसेच राज्यातील विधानसभा निवडणुका आता अवघ्या काही महिन्यावर आले आहे. मात्र यापूर्वीच राज्यातील अनेक नेते मंडळींचा पक्षप्रवेश सुरु आहे. काँग्रेस पक्षाचे माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांनी नुकताच मुंबई येथे कन्या डॉ. केतकी पाटील यांच्यासह भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी पक्षाचे नेते गिरिश महाजन (Girish Mahajan) व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आमदार मंगेश चव्हाण उपस्थित होते.
गिरीश महाजन यांनी जळगाव जिल्ह्यात आणखी एक भूकंप होईल, असे जाहीर केले होते. मात्र त्यांनी त्याचा उल्लेख केला नव्हता. मात्र आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे गेल्या अनेक वर्षांपासूनचे निष्ठावंत कार्यकर्ते व पदाधिकारी संजय गरूड यांनी भाजपात जाण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवार दिनांक ३० जानेवारी २०२४ रोजी मुंबई येथील भव्य कार्यक्रमात ते आपल्या हजारो समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
या अनुषंगाने संजयदादा गरूड यांनी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचा राजीनामा दिला. जामनेर विधानसभा आणि रावेर लोकसभा निवडणुकीत संजयदादा गरूड यांच्या भाजप प्रवेशाने पक्षाला मोठी ताकद मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.