जळगाव लाईव्ह न्यूज । 27 जानेवारी 2024 । मराठा आंदोलनाचा मोठा विजय झाला असून राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. आज पहाटे त्याचे सर्व अध्यादेश काढण्यात आले आहेत. यानंतर मनोज जरंगे पाटील यांनी शनिवारी आंदोलन संपल्याची घोषणा केल्यानंतर मराठा आरक्षण कार्यकर्त्यांनीही जल्लोष केला. मनोज जरांगे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत उपोषण सोडणार असल्याचे सांगण्यात येत आहे. उपोषण सोडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनोज जरंगे संयुक्त पत्रकार परिषदेला संबोधित करणार.
कुणबी प्रमाणपत्र असलेल्या मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण द्याव ही मनोज जरांगे पाटील यांची मुख्य मागणी होती. ती मान्य केली होती. पण सगेसोयरे शब्दाचा समावेश होत नसल्यामुळे लाखो मराठे आरक्षणाच्या लाभापासून वंचित राहत होते. आता या शब्दाचा समावेश झाला आहे. मराठा आरक्षण आंदोलनाचा हा मोठा विजय असून आज नवी मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात मराठ्यांची भव्य सभा होत आहे. या सभेला मनोज जरांगे पाटील, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपाकडून गिरीश महाजन उपस्थित आहेत.
दरम्यान, मागण्या मान्य झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी रात्री दोन वाजता पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी सर्व मागण्या मान्य झाल्या असून त्याचे अध्यादेश निघाल्याचे सांगितले. कुणबी प्रमाणपत्राच्या ज्या नोंदी सापडल्या आहेत, त्यांना प्रमाण पत्र द्यावे तसेच त्यांच्या कुटुंबाना सुद्धा प्रमाणपत्र द्यावे ही मागणी मान्य झाली आहे. तसेच सरकारने सगा सोयराबद्दल अध्यादेश काढले आहे. तो मला देण्यात आल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.
एकनाथ शिंदे यांच्याशी विरोध संपला
समाज म्हणून आमचा आता एकनाथ शिंदे यांचा विरोध संपला आहे. शनिवारी सकाळी वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मुख्यमंत्री पत्र घेऊन येणार आहेत. मी सगळ्यांना विचारून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बोलावले आहे. आम्ही येथे सभा घेणार आहे मुंबईत जाणार नाही. गेल्या अनेक महिन्यांपासून सुरु असलेले मराठा आंदोलन आता संपल्यामुळे मराठा समाजात आनंदाचे वातावरण पसरले आहे.