जळगाव लाईव्ह न्यूज । १४ डिसेंबर २०२३ । चाळीसगाव तालुक्यामध्ये तीव्र दुष्काळाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. सर्वत्र चारा, पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. पिके जळाली असून, विहिरी कोरड्या पडल्या आहेत. अशा परिस्थितीत शेतकरी हवालदिल झाला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय पथकाने गुरुवारी (ता.१४) प्रातिनिधिक स्वरूपात बिलाखेड, डोणदिगर, हिरापूर, शेवरी, रोहिणी व खडकी या गावातील दुष्काळी भागाची पाहणी व शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या.
जिल्ह्यात आलेल्या केंद्रीय पथकात केंद्रीय पशुसंवर्धन विभागाचे सहआयुक्त एच.आर.खन्ना, सांख्यिकी विभागाचे सहायक संचालक जगदीश शाहू यांचा समावेश होता. तर त्यांच्या समवेत अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी चंद्रकांत पाटील, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य लेखाधिकारी महेश अवताडे, पशुसंवर्धन विभागाचे डॉ.गर्जे, चाळीसगाव प्रांताधिकारी प्रमोद हिले, तहसीलदार प्रशांत पाटील, तालुका कृषी अधिकारी किशोर हाडपे यांच्यासह शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
केंद्रीय पथकाने चाळीसगाव तालुक्यातील बिलाखेड येथील शेतकरी निलाबाई अनिल चौधरी यांच्या मका पीक व चंद्रकांत किसन चौधरी, भीमराव बाजीराव दरेकर यांच्या कापूस पीक क्षेत्राची पाहणी केली. डोणदिगर येथील शेतकरी बारकू शिवराम मोरे, भाऊसाहेब काशीनाथ पाटील यांच्या कापूस पीक क्षेत्राची पाहणी केली. हिरापूर येथील शेतकरी आबा रामदास देवरे, मिनाबाई भानुदास जगताप यांच्या कापूस व सुदाम पंडित निकुंभ यांच्या केळी पीक क्षेत्राची पाहणी केली. शेवरी येथील शेतकरी रामकृष्ण गुलाब राठोड व निंबा नथ्थू पाटील यांच्या कापूस पीक क्षेत्राची पाहणी केली. खडकी येथील शेतकरी संजय उत्तम डोखे यांच्या म्हैस गोठ्याची ही पथकाने पाहणी केली.
तालुक्यातील हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी यावर्षी पावसाळ्यामध्ये परिसरात एकदाही मोठा पाऊस झाला नाही. काही भागात हलक्या पावसाच्या सरी पडल्याचे सांगत खरीप अथवा रब्बी हंगामात कोणतीही पिके बहरली नाहीत.कापसासह केळीचे पीक जळू लागले आहे. सध्या या भागात पाण्याची पातळी खूप खोलवर गेली असून विहिरी, बोरवेल, पाझर तलाव कोरडे पडले आहेत. माणसांप्रमाणेच जनावरांनाही चारापाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे. शेतकऱ्यांना पिकांची नुकसान भरपाई मिळणेही गरजेचे असल्याचे व्यथा शेतकऱ्यांनी पथकापुढे मांडली.
पथकाने याची केली पाहणी
जळालेल्या केळी पीक, उध्वस्त झालेली कापूस पीके
पाझर तलाव, कोरड्या पडलेल्या विहिरी
शेतकऱ्यांसाठी सध्या असलेल्या पाण्याची व्यवस्था
जनावरांना चारा कुठून आणता, एकरी किती झालेले नुकसान.
पाण्याच्या पातळीची खोली किती?
विहिरी बोअरवेलचे प्रमाण किती?
पिण्याचे पाणी किती दिवसाने मिळते, त्याची साठवणूक कशी करता ?
पशुसंवर्धन विभागाच्या योजनांचा लाभ मिळत आहे का ?
चाळीसगाव तालुक्यात दुष्काळ पडला असून, येथील परिस्थिती किती गंभीर आहे याची पाहणी करण्यासाठी आम्हाला केंद्र शासनाने याठिकाणी पाठवले आहे. या सर्व परिस्थितीची पाहणी करून हा अहवाल शासनास सादर करणार आहोत. याबाबत पुढील निर्णय शासन स्तरावर घेतला जाईल. अशी ग्वाही एच.आर.खन्ना यांनी यावेळी शेतकऱ्यांपुढे दिली.