जळगाव लाईव्ह न्यूज । २१ सप्टेंबर २०२३ । ऑगस्ट महिन्यात ओढ दिलेल्या पावसाने राज्यासह जळगाव जिल्ह्यात गोकुळ अष्टमीपासून हजेरी लावली. त्यानंतर पावसाने विश्रांती घेतलीय. आता पाऊस पुन्हा सक्रिय होणार असून पुढील तीन, चार दिवस पाऊस कायम असणार असल्याचा अंदाज पुणे हवामान विभागातील ज्येष्ठ शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी व्यक्त केला आहे.
हवामान विभागातर्फे उत्तर महाराष्ट्रात आज गुरुवार (ता. २१)पासून तीन दिवस ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. या कालावधीत काही ठिकाणी पाऊस होईल आणि तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांच्या कडकडाटांसह पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने राज्यात पावसाचा अंदाज आहे. गुरुवारी नाशिक, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, नगरसह २० जिल्ह्यांत काही ठिकाणी पाऊस होईल आणि तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांच्या कडकडाटांसह पावसाचा अंदाज आहे. हीच स्थिती शुक्रवारी (ता. २२) नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव जिल्ह्यांत, तसेच शनिवारी (ता. २३) नाशिक, धुळे, नंदुरबार जिल्ह्यांत असेल.
राज्यातील कोणत्या जिल्ह्यांना यलो अलर्ट?
आजपासून पुढील चार ते पाच दिवस मुंबई, कोकण, पुणे, ठाणे, पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्ये तसेच मराठवाड्यात मुसळधार पाऊस होईल. विदर्भ- बुलढाणा, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा या जिल्ह्यांनाही पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
जळगाव जिल्ह्यात दोन तीन दिवसापासून पावसाची विश्रांती :
दरम्यान, मागील काही दिवसात जळगाव जिल्ह्यात पावसाने चांगली हजेरी लावली. मात्र मागील दोन तीन दिवसापासून पावसाने विश्रांती घेतलीय. दुसरीकडे उन्हाचा चटका वाढला आहे. तापमानात वाढ झाल्याने उकाडा वाढलेला आहे. मात्र आजपासून जिल्ह्यातही पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. यामुळे उकाड्यापासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे.