जळगाव लाईव्ह न्यूज । १० सप्टेंबर २०२३ । शिवसेना-उबाठा पक्षाचे प्रमुख उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचं जळगावात आगमन झाले असून त्यांच्या उपस्थितीत महापालिकेतील लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल व पिंप्राळ्यातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यांचे लोकार्पण होणार आहे. यानंतर ते मानराज पार्क जवळच्या भव्य मैदानावर सभा घेणार आहे.
पिंप्राळ्यात छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य पुतळा उभारण्यात आलेला असून एप्रिल महिन्यात याचे भूमीपुजन हे उध्दव ठाकरे यांच्याहस्ते करण्यात आले होते. याचप्रसंगी त्यांनी आपण या पुतळ्याच्या अनावरणाला देखील येणार असल्याची ग्वाही दिली होती. हा शब्द पाळत ते आज जळगावात आले आहेत.
यामुळे आज ते वचनपूर्ती सभेत नेमके काय बोलणार ? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. तर, या सभेसाठी कुलभूषण पाटील आणि त्यांच्या सहकार्यांनी अतिशय जय्यत तयारी केली असून उध्दव ठाकरे यांच्या या सभेला विक्रमी उपस्थिती लाभणार असल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे.
दरम्यान, या सभेला उध्दव ठाकरे हे प्रमुख मार्गदर्शन करणार असून त्यांच्यासोबत याप्रसंगी खासदार संजय राऊत राज्य विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, ठाकरे पक्षाचे जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत आदींसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.