जळगाव लाईव्ह न्यूज । १० सप्टेंबर २०२३ । तब्बल महिनाभर रुसलेला पाऊस जळगावसह राज्यात परतला असून मागील ३-४ दिवसांपासून कोसळत असलेल्या पावसाने बळीराजा सुखावला आहे. पावसाअभावी माना टाकलेल्या पिकांना मोठा आधार मिळाला आहे. मात्र राज्यात काही ठिकाणी शेतकरी अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. हवामान विभागच्या अंदाजानुसार आज कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज आहे. सहा जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे.
सोबतच जळगाव जिल्ह्यात देखील आगामी दोन दिवस जोरदार पावसाचा अंदाज आहे. आज रविवारी उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार,धुळे आणि जळगाव जिल्ह्यात मध्यमपावसाचा अंदाज आहे.
जिल्ह्यात मागील तीन चार दिवसापासून पावसाने हजेरी लावली. शुक्रवारी झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील २३ मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. जिल्ह्यात तीन आठवड्याच्या विश्रांतीनंतर दमदार पाऊस आला. यामुळे शेतकऱ्यांच्या जीवात जीव आला आहे.
पावसाअभावी करपू लागलेल्या पिकांना देखील नवी संजिवनी मिळाली आहे. सोबतच पावसामुळे जिल्ह्यातील बहुतांश धरणांमधील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. त्यामुळे जळगावकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, राज्यात सक्रीय झालेला पाऊस पुढील २-३ आठवडे कायम राहिल असा अंदाज पुणे वेधशाळेचे प्रमुख के. एस. होसाळीकर यांना वर्तवला आहे.
कोणत्या जिल्ह्यांना यलो अलर्ट?
मुंबईत आज पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे. ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा या सहा जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. कोकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच पुणे, सातारा येथील घाटमाथ्यावर जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. या ठिकाणी काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.