जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ ऑगस्ट २०२३ । राज्यासह देशातील अनेक राज्यात सध्या पावसाने दडी मारली आहे.पावसाळ्याचे तीन महिने संपले आहे अन् फक्त जुलै महिन्यात समाधानकारक पाऊस झाला आहे. जून आणि ऑगस्ट महिन्यात पाऊस झालेला नाही. एकीकडे पाऊस सुट्टीवर गेला आहे तर दुसरीकडे सूर्यनारायण ऐन पावसाळ्यात आग ओकू लागला आहे. देशातील अनेक भागात सरासरी तापमान 27.55 डिग्री सेल्सियस राहिले आहे. यामुळे इतिहासातील सर्वात हॉट महिना यंदाचा ऑगस्ट म्हटला जाणार आहे.
पावसावर अल निनोचा परिणाम दिसून येत असून यंदा ऑगस्ट महिना सर्वात कमी पावसाचा महिना राहिला आहे. 1901 नंतर यंदा सर्वात कमी पाऊस झाला आहे. संपूर्ण ऑगस्ट महिन्यात फक्त चार दिवस पाऊस झाला आहे. तसेच या महिन्यात 33% कमी पाऊस झाला आहे. आता ऑगस्ट महिन्यातील ही कमतरता सप्टेंबर महिन्यात भरुन निघणार का? हा प्रश्न आहे.
हवामान विभागाला आशा
राज्यात जुलै महिन्यात पावसाने दमदार हजेरी लावली. त्यानंतर ऑगस्टच्या सुरुवातीपासूनच पावसाने दडी मारलीय. राज्यात ऑगस्ट महिन्यात जेमतेम 40 टक्केच पाऊस झाला आहे. राज्यातील सर्वच महसूल विभागात ऑगस्ट महिन्यात पाऊस सरासरीपेक्षा कमी राहिला.
आता जोरदार पावसासाठी आवश्यक असलेला कमी दाबाचा पट्टा बंगालचा उपसागरात तयार होत आहे. यामुळे येत्या पाच सप्टेंबरपासून किंवा त्यानंतर विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यापूर्वी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने नाकारली नाही.
कमी झालेल्या पावसामुळे राज्यातील धरणांमध्ये जलसाठा समाधानकारक झालेला नाही. राज्यातील मोठे प्रकल्प भरण्यासाठी सप्टेंबर महिन्यात चांगल्या पावसाची गरज आहे. अन्यथा यंदा राज्यावर दुष्काळाचे सावट असणार आहे.