जळगाव लाईव्ह न्यूज । ९ मार्च २०२१ । पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा येथे कोरोना लसीकरण ऑनलाईन नोंदणीचा शुभारंभ करण्यात आला आहे.
देशभरात कोविड १९ लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरूवात झाली असून यामध्ये सामान्य व्यक्तींनाही करोना लस घेता येणार आहे. लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात ६० वर्षांहून अधिक वयाच्या व्यक्तींना लस दिली जाणार आहे. तसंच गंभीर आजाराशी झुंजणाऱ्या ४५ वर्षांहून अधिक वयाच्या व्यक्तींनाही लस दिली जाणार आहे. यासाठी पात्र नागरिकांना को – विन अॅपवर रजिस्ट्रेशन करावे लागणार आहे.
दि. ८ मार्च रोजी या कोरोना लसीकरण ऑनलाईन नोंदणीचा शुभारंभ नगरदेवळा ता. पाचोरा येथे जिल्हा परिषद सदस्य रावसाहेब पाटील, पंचायत समिती सदस्य वसंत गायकवाड, सरपंच प्रतीक्षा काटकर, वैद्यकीय अधिकारी योगेश बसेर व आरोग्य कर्मचारी यांच्या हस्ते करण्यात आले. कोविड लस मिळविण्यासाठी तुम्हाला फोटो आय.डी. पुराव्यासह ऑनलाईन नोंदणी करावी लागेल. ऑन दि स्पॉट कोणतीही नोंदणी होणार नाही. लस कुठल्या केंद्रावर टोचून घ्यायची, याचे केंद्रही आपण स्वत:च निवडू शकणार आहेत. लसीचे दोन्ही डोस केव्हा दिले जातील याचा एस. एम. एस. पाठविला जाईल. २८ दिवसांच्या फरकाने दुसरा डोस दिला जाणार आहे. लस पूर्णपणे सुरक्षित असून नागरिकांनी लसीकरणासाठी पुढे यावे असे आवाहन नगरदेवळा वैधकीय अधिकारी डॉ. विरेंद्र पाटील, योगेश बसेर यांनी केले आहे.