जळगाव लाईव्ह न्यूज । २४ ऑगस्ट २०२३ । कोरोना सारख्या महामारीतून जग सावरलं आहे. सर्वकाही पाहिल्यासारखं सुरळीत झालं आहे. मात्र यानंतर नवनवीन आजार डोकं वर काढत आहे. याच दरम्यान, जळगाव जिल्ह्यात पहिल्यांदाच ‘लेप्टोस्पायरोसिस’ (Leptospirosis) आजाराचा रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. अमळनेर तालुक्यातील डांगरी येथील चार वर्षांच्या बालकाला ही लागण झाली आहे. जिल्हास्तरावरील आरोग्य विभागाच्या पथकाने डांगरी येथे भेट देत पाहणी केली.
अमळनेर तालुक्यात प्रथमच या रोगाचे रुग्ण आढळून आले असून, चार वर्षांच्या बालकाला लागण झाली होती. हे कुटुंबीय ऊसतोडीसाठी बाहेर जिल्ह्यात गेले होते. परत आल्यावर कुटुंबातील बालक आजारी पडल्याने धुळे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याठिकाणी हे निदान करण्यात आले. सध्या उपचार घेऊन बालक व कुटुंबीय घरी पोहोचले असून, बालकाची प्रकृती स्थिर आहे.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन बहेकर यांच्या सूचनेवरून जिल्हा साथरोग अधिकारी प्रमोद पांढरे व डॉ. वाभळे, हिवताप नियंत्रण विभागाचे आरोग्य सहाय्यक विपुल लोणारी व धनराज सपकाळे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. गिरीश गोसावी, डॉ. रनाळकर यांच्यासह पथकाने डांगरी येथे भेट देत पाहणी केली.
काय आहेत लक्षणे?
रोगबाधित प्राण्यांच्या लघुशंकेतून ‘लेप्टोस्पायरोसिस’ नावाच्या या रोगाचा प्रसार होत असून, या आजारात तीव्र ताप, अंगदुखी, डोळे लालसर होणे, तीव्र डोकेदुखी अशी लक्षणे दिसून येतात. या रोगाचे रुग्ण मुख्यत्वे करून भात व ऊस लागवडीच्या क्षेत्रात तसेच ठाणे, रत्नागिरी, रायगड, पालघर आदी भागांत आढळून येतात.
संसर्गाला आळा कसा घालावा?
प्राण्यांची लघवी ज्याठिकाणी असेल अशा ठिकाणांशी संपर्क टाळावा, साठून राहिलेल्या पाण्यामध्ये जाणे टाळावे. प्राण्यांच्या लघवीशी आपल्या शरीराचा थेट संपर्क येऊ नये यासाठी प्राण्यांसोबत काम करताना पूर्ण कपडे घालावेत, बंद शूज, हातमोजे इत्यादींचा वापर करावा
सांडपाणी किंवा पुराच्या पाण्याशी थेट संपर्क आल्यास आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार वैद्यकीय सल्ला घेतल्यानंतर अँटिबायोटिक्स प्रोफिलॅक्सिस (उदाहरणार्थ डॉक्सिसायक्लीन किंवा अझिथ्रोमायसिन) याची शिफारस केली जाते
पाळीव प्राण्यांमध्ये संसर्गाला प्रतिबंध घालणेदेखील महत्त्वाचे आहेआजकाल बहुतांश घरांमध्ये पाळीव प्राणी असतात. त्यांना संसर्ग होऊ शकतो किंवा त्यांच्यामार्फत संसर्ग पसरू शकतो.
बऱ्याचदा त्यांना काहीच लक्षणे दिसून येत नाहीत. त्यामुळे पाळीव प्राण्यांमध्ये संसर्गाला आळा घालणे महत्त्वाचे आहे. उंदीर, जंगली प्राणी आणि प्राण्यांचे मृतदेह यांच्यापासून पाळीव प्राण्यांना दूर ठेवावे. भरपूर पाऊस पडून गेल्यावर किंवा पुरानंतर पाळीव प्राण्यांना दूषित पाण्यात जाऊ देऊ नये