जळगाव लाईव्ह न्यूज । २० ऑगस्ट २०२३ । जळगाव तालुक्यातील मन्यारखेडा तालावात बुडून २२ वर्षीय तरूणाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आलीय. अंकुश शिवाजी सुरळकर (वय-२२) असे मृत तरुणाचे नाव असून तो बुलढाणा जिल्ह्यातील धामणगाव येथील राहणार आहे. गेल्या आठवड्यापासून नोकरीच्या शोधात बहिणीकडे आला होता. याप्रकरणी नशिराबाद पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरात अंकुश सुरळकर याचे बहिण व मेव्हणे अनिल दामू इंगळे राहतात तो गेल्या आठ दिवसांपासून नोकरीच्या शोधासाठी आलेला होता. गुरूवारी १७ ऑगस्ट रोजी सकाळी नेहमीप्रमाणे नोकरी शोधायला जात असल्याचे सांगून बहिणीच्या घरातून निघून गेला. त्यानंतर तो घरी परतलाच नाही. त्याच्या नातेवाईकांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला परंतू काहीच माहिती मिळाली नाही.
दरम्यान, शनिवारी १९ ऑगस्ट रोजी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास मन्यारखेडा गावानजीक असलेल्या तलावात एका अनोळखी तरूणाचा मृतदेह तरंगतांना आढळून आला. नशिराबाद पोलीसांनी धाव घेवून पंचनामा केला आणि मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला. सुरूवातीला नशिराबाद पोलीस ठाण्यात अनोळखी म्हणून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. याचा तपास सहाय्यक फौजदार हरीष पाटील यांच्याकडे आहे.
त्यानंतर नातेवाईकांनी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात धाव घेवून मयताची ओळख पटून अंकूश सुरळकर असल्याचे निष्पन्न झाले. यावेळी नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मयताच्या पश्चात आई कामिनी, वडील शिवाजी दशरथ सुरळकर, मोठा भाऊ निलेश आणि विवाहित बहिण असा परिवार आहे.