⁠ 
रविवार, डिसेंबर 22, 2024
Home | गुन्हे | गोमांसचा संशय, पोलिसांची धाव आणि तरुणांनी जाळला ट्रक, पोलिसांवर दगडफेकीने तणाव

गोमांसचा संशय, पोलिसांची धाव आणि तरुणांनी जाळला ट्रक, पोलिसांवर दगडफेकीने तणाव

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज | १८ ऑगस्ट २०२३ | जळगाव शहरापासून जवळच असलेल्या पाळधी येथे गोमांस असल्याच्या संशयावरून तरुणांनी ट्रक जाळल्याची घटना गुरुवारी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास घडली. बांभोरीजवळ एका पेट्रोल पंपावर थांबलेल्या ट्रकमधून दुर्गंधी येत असल्याने काही तरुणांनी ट्रक थांबवला. पोलिसांना याबाबत माहिती मिळाल्याने त्यांनी धाव घेत ट्रक पाळधी येथे नेणे सुरू केले. ट्रकमध्ये जनावरांचे कातडे असल्याची खात्री झाल्याने ट्रक बायपासच्या जवळील एका गोडवूनमध्ये लावण्याचे ठरले. अचानक काही तरुण आक्रमक झाले आणि त्यांनी पोलिसांवर दगडफेक सुरू झाली. जमाव पोलिसांवर भारी पडल्याने काहींनी ट्रकची तोडफोड करीत ट्रकला आग लावली. पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांनी धाव घेतली. रात्री उशिरा १२ संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

गुरुवारी रात्री छत्रपती संभाजी नगरकडून धुळ्याच्या दिशेने ट्रक क्रमांक युपी.९३.एटी.८१३५ हा जात होता. बांभोरी येथे रात्री १०.३० वाजेच्या सुमारास ट्रक एक पेट्रोल पंपावर थांबला असता त्यातून दुर्गंधी येत होती. त्यामुळे यातून गोमांसाची वाहतूक होत असल्याचा संशय काही जणांना आला. त्यांनी ट्रक चालकाला थांबविले. ट्रक चालक सल्लू खान बाबू खान वय-३५ आणि क्लिनर मानसिंग श्रीराम कुशवाह दोघे रा.नई बस्ती, राम चबुतरा ता.कल्पी, जि.जालोन, उत्तरप्रदेश यांची चौकशी केली जात असताना पंपावर गर्दी झाली. काहींनी या संदर्भात पाळधी पोलीस दूरक्षेत्राच्या कर्मचार्‍यांना माहिती दिली. पोलिसांनी धाव घेत माहिती घेऊन ट्रकला पाळधी बायपास येथील गोडावूनकडे रवाना केले. घटनेची माहिती मिळाल्याने धरणगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक आणि परिरक्षावधिन उपविभागीय पोलीस अधिकारी आप्पासो पवार हे पथकासह पोहचले.

ट्रकमधून दुर्गंधी येत असल्याने ट्रक शहराच्या बाहेर असलेल्या गोदाममध्ये लावण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला होता. गोदाम बाहेर अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी यांनी ट्रकची तपासणी केली असता त्यात जनावरांचे कातडे असल्याचे निष्पन्न झाले. पथकाने कातड्याचे नमुने घेतले आणि ट्रक गोदाममध्ये लावण्याचे सांगितले. सर्व सुरळीत आणि शांततेत पार पडत असताना अचानक जमाव वाढला आणि कारवाईत हस्तक्षेप करू लागला.

पोलिसांनी जमावाला पांगवण्याचे प्रयत्न केले असता काही तरुण आक्रमक झाल्याने पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. लाठीचार्ज होताच जमाव महामार्गाच्या दिशेने आणि पाळधी गावाच्या दिशेने पळाला. पोलिसांपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या जमावापैकी काही तरुणांनी अचानक घोषणाबाजी करीत पोलिसांवर दगडफेक करण्यास सुरुवात केली. पोलीस कमी आणि जमाव जास्त अशी अवस्था असल्याने जमाव पोलिसांवर भारी पडला. दगडफेकीत एक कर्मचारी जखमी झाला तर पोलिसांच्या वाहनाच्या काचा फुटल्या. आक्रमक झालेल्या जमावपैकी काहींनी ट्रकची तोडफोड करीत आग लावली.

घटनास्थळी बराच काळ तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने तातडीने अतिरिक्त कुमक मागविण्यात आली. काही वेळात जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, चाळीसगाव अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, चोपडा उपविभागीय पोलीस अधिकारी कृषीकेश रावले, जळगाव उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत, स्थानिक गुन्हे शाखा निरीक्षक किसनराव नजनपाटील, जिल्हापेठ निरीक्षक विशाल जैस्वाल, एरंडोल, पारोळा पोलीस निरीक्षक आणि आरसीपी पथकासह पोहचले.

एलसीबीच्या पथकाने लागलीच माहिती घेत संशयितांची धरपकड सुरू केली. सुरुवातीला तिघांना ताब्यात घेतल्यावर त्यांनी आणखी काही तरुणांची नावे सांगितली. पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत १२ जणांना ताब्यात घेतले होते. जैन इरिगेशनच्या अग्निशमन बंबाच्या मदतीने ट्रकची आग आटोक्यात आणण्यात आली. ट्रकमध्ये असलेले लहान सिलेंडर वेळीच बाहेर काढले आणि डिझेल टँक जवळील आग विझविल्याने मोठा अनर्थ टळला. पोलीस पथक पहाटेपर्यंत घटनास्थळी थांबून होते. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, पोलिसांनी वेळीच धाव घेतल्याने मोठा तणाव रोखणे शक्य झाले आहे. घटना घडली त्याठिकाणी संमिश्र वस्ती होती मात्र समजूतदार नागरिकांनी कोणताही अनुचित प्रकार होऊ दिला नाही मात्र तरुणांनी घोळ केला आणि वातावरण चिघळले. सामाजिक शांततेचा भंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांनी दिला आहे.

author avatar
चेतन वाणी
पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.