⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगावच्या सुपुत्राचा विदेशात डंका; ट्रिपल केसरी सोबतच जागतिक चॅम्पियनशिपमध्ये देशासाठी सुवर्णपदक

जळगावच्या सुपुत्राचा विदेशात डंका; ट्रिपल केसरी सोबतच जागतिक चॅम्पियनशिपमध्ये देशासाठी सुवर्णपदक

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज। ३१ जुलै २०२३। महाराष्ट्राचा स्टार कुस्तीपटू तीन वेळा ‘महाराष्ट्र केसरी’ विजेता आणि अप्पर पोलिस अधीक्षक विजय नथ्थू चौधरीने भारत देशाचा झेंडा अटकेपार रोवला आहे. कॅनडाच्या विनिपेग येथे झालेल्या जागतिक पोलिस अँड फायर गेम्समध्ये कुस्ती या खेळात कॅनडाच्या गतविजेत्या जेसी साहोताचा पराभव करीत त्याने भारताचे नाव उंचावत जगज्जेतेपद काबीज केले.

जागतिक पोलीस अँड फायर गेम्स हे जागतिक स्तरावर पोलीस दलासाठी ऑलिम्पिक मानले जाते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत चौधरीने उपांत्य फेरीत त्याचा सामना गतविजेता आणि संभाव्य विजेत्या जेसी साहोताशी झाला. त्याने अटीतटीच्या सामन्यात साहोताचा ११-०८ अशा फरकाने पराभव करीत अंतिम फेरी गाठली. या विजयानंतरच विजयचे जगज्जेतेपद निश्चित झाले होते. अंतिम सामन्यात त्याने अमेरिकेच्या जे. हेलिंगरवर १० गुणांची मोठी आघाडी घेत अंतिम सामना ११-०१ ने जिंकत भारताला सुवर्णपदक मिळवून दिले.

जळगावच्या चाळीसगाव जिल्ह्यातील सायगाव बागली या गावचा विजय चौधरी हा महाराष्ट्रातील पुणे विभागाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागामध्ये अप्पर पोलिस अधीक्षक म्हणून कार्यरत आहे. याशिवाय तीन वेळा महाराष्ट्र केसरी विजेतेपद, तसेच अनेक मानाच्या कुस्त्यांमध्ये बाजी आणि राष्ट्रीय सुवर्णपदकावर देखील विजय चौधरीने आपल्या नावाची मोहोर उमटवली आहे. चौधरीला काही महिन्यांपासून प्रशिक्षक हिंदकेसरी रोहित पटेल यांनी बायो बबलमध्ये ठेवले होते. तसेच, पुण्यातील कात्रज येथील मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुलात अनेक महिने कॅनडाच्या टाइम झोननुसार प्रशिक्षण देत होते.

महाराष्ट्रातील एक नामांकित आणि प्रतिष्ठित कुस्तीपटू विजय चौधरी आता जागतिक चॅम्पियनशिपमध्ये देशासाठी सुवर्णपदक जिंकून भारताचा नवीन ‘रेसलिंग सेनसेशनल’ बनला आहे. माझा विजय भारतीय पोलिसांना अर्पण’काही महिन्यांपूर्वी मी महाराष्ट्र राज्य पोलीस दलासाठी सुवर्णपदक जिंकले होते. त्या दिवशीच मी ठरवले होते की मला जागतिक पोलीस खेळांमध्ये माझ्या देशासाठी सुवर्णपदक जिंकायचे आहे. आज माझ्या मेहनतीचे चीज झाले असून मी जागतिक स्पर्धेत भारतासाठी सुवर्ण पदक जिंकून भारतीय कुस्ती क्षेत्रासाठी भरीव कामगिरी केल्याचा मला आनंद झाल्याची प्रतिक्रिया जगज्जेत्या विजय चौधरीने विजयानंतर व्यक्त केली.

‘महाराष्ट्र राज्य पोलीस विभागातील माझ्या वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांच्या सततच्या पाठिंब्यामुळेच हा विजय शक्य झाला.’ मी हा विजय भारतातील प्रत्येक पोलीस अधिकार्‍याला समर्पित करतो. जो देशाला प्रथम स्थान देऊन समाजाची २४ तास सेवा करत असतो. हे सुवर्णपदक मी संपूर्ण भारतीय पोलीस दलाला समर्पित करत असल्याचेही चौधरीने अभिमानाने सांगितले.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.