जळगाव लाईव्ह न्यूज । २७ जुलै २०२३ । बंगालच्या उपसागरात कमी दाबाची प्रणाली विकसित व वायव्य दिशेला तिची हालचाल होण्याची शक्यता असल्याने पुढील काही दिवस महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, आज राज्यातील ४ जिल्ह्यांना रेड अलर्ट तर ९ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला होता. हवामान खात्याने या भागात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
हवामान विभागाच्या अंदाजनुसार, आज पुण्यासह ५ जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर ७ जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. १४ जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
कोणत्या जिल्ह्यांना रेड आणि ऑरेंज अलर्ट
रेड अलर्ट असलेल्या पुणे, सातारा, रत्नागिरी, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तर मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, भंडारा, गोंदिया, नागपूर, यवतमाळ या जिल्ह्यात ऑरेंज अलर्टमुळे मुसळधार पावसाची शक्यता आहे.
जळगावात कशी आहे पावसाची स्थिती?
बुधवारी जिल्ह्यात पावसाने विश्रांती घेतल्याने दुपारनंतर आकाश मोकळे झाले. यादरम्यान, उकाडा चांगलाच वाढला होता. मात्र रात्री जिल्ह्यातील काही ठिकाणी तुरळक सरी कोसळल्या. बंगालच्या उपसागरात कमी दाबाची प्रणाली विकसित राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. जळगावात आज मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे. सकाळपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. दुपारनंतर काही ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे.
यापूर्वी बुधवारी जळगाव जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला होता. मात्र काल पावसाने हुलकावणी दिल्याचे दिसून आले. परंतु जिल्ह्यात गेल्या आठवड्यात समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकरी सुखावला आहे.