जळगाव लाईव्ह न्यूज । १३ जुलै २०२३ । वर्ष उलटून गेलं तरी शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नाहीय. त्यातच त्यात राष्ट्रवादी सत्तेत सामील झाल्याने कोणाला कोणते खाते मिळणार याची उत्सुकता सर्वांना आहे. अशातच राष्ट्रवादीला महत्त्वाची खाती देण्यास शिवसेना आमदारांचा विरोध असल्याचेही समोर आले आहे. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
नेमकं काय म्हणाले खडसे?
शिंदे-फडणवीस सरकारचा दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार अजून झालेला नसून यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गटाची मोठी कोंडी होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या रूपाने तिसरा बिडू सरकारमध्ये सामील झाल्याने शिंदे गटाची डोकेदुखी वाढलीय. आपल्याकडील मंत्रीपदे राष्ट्रवादीच्या वाट्याला जातील याची धास्ती शिंदे गटाला असल्याने मंत्रिमंडळात नव्याने सामील होणाऱ्या शिंदे गटाच्या आमदारांमध्ये मोठी अस्वस्थता आहे.’
विस्ताराचा मुहूर्त हुकला?
गेल्या आठ दिवसांपासून मंत्रिमंडळाचा विस्तार आणि नव्या मंत्र्यांच्या खाते वाटपाचा तिढा सोडवण्यासाठी महायुतीच्या जोरबैठका सुरू होत्या. अर्थ खातं, सहकार आणि ग्रामीण या तीन खात्यावरून वाद होता. शिंदे गटाने अजित पवार यांना अर्थ खातं देण्यास विरोध केल्याने हा तिढा अधिकच वाढला होता. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी काल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. या भेटीत मंत्रिमंडळ विस्तार आणि खाते वाटपाचा तिढा सुटला होता. त्यामुळे आज किंवा उद्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची चर्चा होती. मंत्रिमंडळाचा विस्तार आज किंवा उद्या होणार असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही आमदारांना फोन करून मुंबईतच राहण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र आता मंत्रिमंडळाचा विस्तार पावसाळी अधिवेशनानंतरच होणार असल्याची माहिती आहे.