जळगाव लाईव्ह न्यूज । ११ जुलै २०२३ । हवामान खात्याने राज्यातील जळगावसह २४ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र सोडून हवामान विभागाकडून आज महाराष्ट्रात यलो अलर्ट देण्यात आला आहे.
विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील काही ठिकाणी आज वादळी वाऱ्यासह पाऊस होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पुढचे 48 तास उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भासाठी महत्त्वाचे आहेत. तिथे अति मुसळधार ते मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
या २४ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता…
हवामान खात्याकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, नाशिक, नंदूरबार, धुळे, अहमदनगर, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, बीड, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, जालना, बुलढाणा, वाशिम, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, अमरावती, वर्धा, नागपूर, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, अकोला या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता असून या वेळी वादळी वारेही वाहतील.
मध्य महाराष्ट्राच्या काही भागांमध्येही मुसळधार पावसाची शक्यता आहे, तर मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो. या परिस्थितीमध्ये १३ जुलैनंतर सुधारणा होऊ शकते. तोपर्यंत चढ्या तापमानाचा ताप राज्यात अनेक ठिकाणी जाणवण्याची शक्यता आहे.