जळगाव लाईव्ह न्यूज । ४ जुलै २०२३ । दोन दिवसापूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून देणारी घटना घडली असून अजित पवार यांनी बंड करत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. अजित पवार यांच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादीत प्रचंड खळबळ माजली आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासोबत जायचं की अजित पवार यांना पाठिंबा द्यायचा या द्विधा मनस्थितीत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अडकले आहेत. यातच राष्ट्रवादीचे शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे.
खासदार अमोल कोल्हे खासदारकीचा राजीनामा देणार आहेत. अमोल कोल्हे यांच्या या निर्णयाने राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. पक्षात पडलेली फूट आणि झालेली द्विधा मनस्थिती यातून अमोल कोल्हे हे खासदारकीचा राजीनामा देणार असल्याचं सांगितलं जात आहे.
त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. अमोल कोल्हे आजच शरद पवार यांच्याकडे त्यांचा राजीनामा सोपविणार आहेत. रविवारपासून राष्ट्रवादीत नाट्यमय घटना घडत आहेत. अजित पवार यांच्या शपथविधी वेळी कोल्हे हे उपस्थित होते. पण त्यांनी आता खादारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे.
रविवारी अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत आठ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली होती. या शपथविधी सोहळ्याला खासदार अमोल कोल्हे हे देखील उपस्थित होते. मात्र यावर त्यांनी स्पष्टीकरण दिल आहे. अजित पवार यांच्या शपथविधीला उपस्थिती असल्याबद्दल बोलताना कोल्हे म्हणाले, मी माझ्या कामानिमित्त अजित पवार यांना भेटायला गेलो होतो. शपथविधी आहे, म्हणून आपण तिकडे गेलो नव्हतो. मला शपथविधीची कल्पनाही नव्हती. तिथे गेल्यानंतर याबद्दल समजले आणि तिथूनच मी माझ्या कार्यालयाला माझा राजीनामा तयार ठेवण्यास सांगितले होते.