पुढील पाच दिवस कोसळधार! तुमच्या जिल्ह्यात कशी राहणार पावसाची स्थिती?
जळगाव लाईव्ह न्यूज । १ जुलै २०२३ । राज्यात मागील काही दिवसापासून पाऊस सुरु आहे. राज्यातील अनेक ठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावलीय तर अद्यापही काही ठिकाणी पावसाने दमदार हजेरी न लावल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत. दरम्यान, हवामान खात्याने पुढील पाच दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. हवामान विभागाचे प्रमुख के.एस.होसाळीकर यांनी एक ट्वीट करून ही माहिती दिली आहे.
या ट्वीटच्या होसाळीकर यांनी राज्यात येत्या पाच दिवसांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. येत्या 2 जुलैपासून मुसळधार पावसाचा नवीन स्पेल सुरू होण्याची शक्यता आहे. त्याचा प्रभाव दक्षिण भारतातील भागात व संलग्न भागावर होण्याची शक्यता आहे. राज्यातही 4 आणि 5 जुलै या दिवशी त्याचा प्रभाव राहील, असं होसाळीकर यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
आज कोकण विभागात काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे, तर पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. मुंबईत गेल्या आठवडाभरापासून पाऊस कायम असून आज सकाळपासूनच पावसाने जोर धरला आहे.
जळगावातील शेतकऱ्यांना मुसळधार पावसाचा अपेक्षा?
दरम्यान राज्यात पाऊस होत असला तरी बऱ्याच ठिकाणी अद्याप शेतांमध्ये पेरणी करण्याइतका पाऊस झालेला नाही. जळगाव जिल्ह्यात देखील मागील काही दिवसापासून अधून मधून मध्यम स्वरूपाचा पाऊस होत आहे. मात्र जिल्हयात पेरणीयोग्य पाऊस झालेला नाहीय. शेतकरीवर्ग आता जोरदार पावसाची प्रतीक्षा करीत आहे.