जळगाव लाईव्ह न्यूज । २३ जून २०२३ । महाराष्ट्रात मान्सून ११ जून रोजी दाखल झाला होता. मात्र बिपरजॉय चक्रीवादळामुळे मान्सूनचा प्रवास खोळंबला होता. दरम्यान, राज्यात मान्सूनच्या आगमनानंतर दडी मारुन बसलेला पाऊस आजपासून पुन्हा एकदा सक्रीय होण्याची शक्यता आहे. दरम्यान, राज्यातील अनेक भागात काल पावसाने हजेरी लावली असल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात आजपासून मध्य महाराष्ट्र, विदर्भ मराठवाडा आणि कोकणामध्ये वादळीवाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसचे कोकण किनारपट्टीवर तीव्र गतीने वारे वाहनार असून, मच्छिमारांना समुद्रात मासेमारी करण्यासाठी न जाण्याचा सल्ला हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेल्या अंदानुसार येत्या 24 तारखेपासून राज्यात पावसाचा जोर वाढणार असून, याचदरम्यान मराठवाड्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
जळगाव जिल्ह्याला या तारखेला येलो अलर्ट जारी?
दरम्यान, जळगाव जिल्ह्यात अद्यापही पाऊस सक्रिय झाला नाहीय. मान्सून पाऊस लांबल्याने जिल्ह्यात उकाडा वाढला होता. मात्र मागील काही दिवसापासून ढगाळ वातावरणामुळे तापमानाचा पारा ४० अंशखाली आल्यानं दिलासा मिळाला. मात्र पावसाने हजेरी लावली नाहीय. दरम्यान, आजपासून राज्यात पाऊस सक्रीय होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली. त्यानुसार जळगाव जिल्ह्याला २४ आणि २५ जून रोजी पावसाचा येलो अलर्ट जारी आयएमडीकडून देण्यात आला आहे.
या वर्षातील पावसाळ्यातील हा पहिलाच पाऊस आहे. मृग नक्षत्र कोरडे गेल्यानंतर शेतकऱ्यांना पावसाची मोठ्या आतुरतेने प्रतीक्षा होती.