दीपस्तंभ मनोबलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश | आठ विद्यार्थी बँक पिओ पदी तर अन्य पाचची विविध विभागात निवड
जळगाव लाईव्ह न्यूज । २० एप्रिल २०२३ । आयबीपीएस परीक्षांच्या माध्यमातून दीपस्तंभ फाउंडेशन मनोबल प्रकल्पाचे आठ विद्यार्थी बँक प्रोबेशनरी अधिकारी पदी तर अन्य पाच विद्यार्थ्यांची सैन्य, पोलीस आणि भारतीय रेल्वेत निवड झाली आहे. यात बँक प्रोबेशनरी अधिकारी पदी प्रशांत केदारे, नांजा पावरा, सचिन कोलकर, दीपक गजरे, अमोल आव्हाड, हिना मुजावर, वैष्णव गित्ते, महादेव सागर यांची निवड झाली आहे, तर नेहरू झारखंडें याची सैन्यात, सुरेखा अवथळे पोलीस पदी तर साईनाथ शिंदे, विनायक मगदूम आणि भास्कर पांढरे याची भारतीय रेल्वेत निवड झाली आहे.
सुरवातीच्या काळात रिक्षा चालवून उदर निर्वाह करणारा दिव्यांग प्रशांत केदारे गेल्या ५ वर्षापासुन मनोबल प्रकल्पात स्पर्धा परिक्षांचे प्रशिक्षण घेत होता. त्याचे आई वडील भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करतात. प्रज्ञाचक्षू नांजा पावरा मध्य प्रदेशातील निवाली गावाचा रहिवासी असून तो ५ वर्षांपासून प्रकल्पात प्रशिक्षण घेत होता.आई वडील शेत मजुरी करतात. २ वर्षांपासून प्रकल्पात असलेला प्रज्ञाचक्षू सचिन कोलकर औरंगाबादचा आहे. सोलापूर जिल्ह्यातील भंडीशेगाव येथील प्रज्ञाचक्षू दीपक गाजरे गेल्या ४ वर्षांपासून प्रकल्पात होता.
अहमदनगर जिल्ह्यातील गावठाण गावातील अमोल आव्हाड ४ वर्षांपासून प्रकल्पात होता. प्रज्ञाचक्षू हिना मुजावर शिरूरची रहिवासी असून ३ वर्षा पासून बँकिंगच्या परीक्षेची तयारी करत होती. छत्रपती संभाजी नगरचा प्रज्ञाचक्षू वैष्णव गित्ते २ वर्षांपासून प्रकल्पात होता. प्रज्ञाचक्षू महादेव सागर पुणे जिल्ह्यातील काळेवाडी येथील रहिवासी आहे. अमरावती जिल्ह्यातील बामादेही गावातील दिव्यांग नेहरू झारखंडे ६ वर्षांपासून प्रकल्पात होता. त्याचे आई वडील हातमजुरी करतात.
वर्धा जिल्ह्यातील भिवापूर गावाची सुरेखा अवथळे गेल्या ५ वर्षांपासून प्रकल्पात होती. नांदेड जिल्ह्यातील लाडका गावाचा अल्पदृष्टी साईनाथ शिंदे गेल्या ६ वर्षांपासून प्रकल्पात प्रशिक्षण घेत होता. प्रज्ञाचक्षू भास्कर पांढरे नांदेड जिल्ह्यातील भिमापुरी येथील रहिवासी आहे.
प्रज्ञाचक्षू, दिव्यांग व वंचित विदयार्थ्यानी मिळवलेले हे यश अत्यंत प्रेरणादायी व भविष्यासाठी अत्यंत दिशादर्शक आहे.दीपस्तंभ मनोबलच्या माध्यमातून गेली काही वर्ष जे प्रभोधन , प्रेरणा व मार्गदर्शनाची यंत्रणा उभारली गेली त्यातून विदयार्थ्यांनी घेतलेल्या कष्टाला हे फळ आलेले आहे.या प्रकल्पात मार्गदर्शन करणाऱ्या तसेच हितचिंतक व देणगीदारांचे मी मनापासून आभार मानतो अश्या भावना दीपस्तंभ फाऊंडेशनचे संस्थापक यजुर्वेंद्र महाजन यांनी यावेळी व्यक्त केल्या.