जळगाव लाईव्ह न्यूज । २५ मार्च २०२३ ।
गॅस सिलिंडरचे दर गगनाला भिडले आहे. यामुळे सर्वसामान्यांचा महिन्याचे बजेट बिघडले असून ग्रामीण भागात पुन्हा चुली पेटू लागल्याचे दिसून येत आहे. अशातच पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना मोदी सरकारने मोठी भेट दिली आहे. सरकारने 9.60 कोटी लाभार्थ्यांसाठी अनुदानाचा कालावधी एका वर्षासाठी वाढवला आहे.
म्हणजेच आता पुढील एक वर्षासाठी त्यांना प्रति सिलिंडर 200 रुपये अनुदान मिळत राहणार आहे. लाभार्थी एका वर्षात एकूण 12 एलपीजी सिलिंडरवर सबसिडी घेऊ शकतात. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी सरकारच्या या निर्णयाची माहिती दिली. मे 2022 मध्ये, सरकारने उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी प्रति गॅस सिलेंडर (12 सिलिंडरपर्यंत) 200 रुपये सबसिडी जाहीर केली होती.
अनुराग ठाकूर म्हणाले की, या पाऊलामुळे सरकारला 2022-23 मध्ये 6,100 कोटी रुपये आणि 2023-24 मध्ये 7,680 कोटी रुपये लागतील. अनुदानाचे पैसे थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केले जातात.