जळगाव लाईव्ह न्यूज । २३ मार्च २०२३ । जळगाव जिल्ह्यात लाचखोरीने अक्षरशः उच्छाद मांडला आहे. जिल्ह्यात दर आठवड्यात लाचलुचपत विभागाची कारवाई होत असताना दिसून येत आहे. अशातच आता पाच हजाराची लाच घेताना चाळीसगाव तालुक्यातील बोरखेडा येथील लाचखोर तलाठीसह कोतवालास जळगाव लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात अटक केली आहे. याकारवाईने मोठी खळबळ उडाली.
ज्ञानेश्वर सूर्यभान काळे (50, शिवशक्ती नगर, भडगाव रोड, चाळीसगाव) असे तलाठीचे नाव असून किशोर गुलाबराव चव्हाण (37, श्रीकृष्ण नगर, चाळीसगाव) असं कोतवालचे नाव आहे. या दोघांविरुद्ध चाळीसगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमका काय आहे प्रकार?
बोरखेडा बु.॥ गावातील 42 वर्षीय तक्रारदाराच्या वडिलांनी मृत्यूपत्र केले असून त्यानुसार तक्रारदाराच्या नावे बोरखेडा बु.॥ येथील शेतजमीन करण्यात आली असून त्यांच्या हिश्यावर एकूण तीन गट वाटणीस आलेले आहेत. तीन गटांपैकी 64/2 ही शेतजमीन तक्रारदार यांना त्यांची पत्नी प्रतिभा पाटील यांच्या नावावर करायची होती जेणेकरून ते अल्पभूधारक म्हणून गणले जातील.
यास्तव त्यांनी नोव्हेंबर-2021 मध्ये तलाठी काळे यांच्याकडे प्रकरण सादर केले होते. त्यावेळी काळे यांनी सात हजार रुपये लाच स्वीकारली होती मात्र त्यानंतरही त्यांनी काम केले नसल्याने तक्रारदाराने 9 फेब्रुवारी रोजी तलाठी कार्यालयात भेट घेतल्यानंतर सुरूवातीला सात हजारांची मागणी केली व त्यात पाच हजार रुपये देण्यावर तडजोड झाल्यानंतर एसीबीकडे तक्रार नोंदवण्यात आली. गुरुवारी दुपारी एक वाजता तलाठी कार्यालयात तक्रारदाराकडून लाच स्वीकारताच तलाठी व कोतवाल यांना अटक करण्यात आली. संशयीतांविरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
यांनी केला सापळा यशस्वी
हा सापळा जळगाव एसीबीचे पोलिस उपअधीक्षक शशिकांत पाटील यांच्या नेतृत्वात निरीक्षक एन.एन.जाधव, पोलिस निरीक्षक संजोग बच्छाव, ईश्वर धनगर, राकेश दुसाने, सचिन चाटे, दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील, अशोक अहिरे, हवालदार सुनील पाटील, हवालदार रवींद्र घुगे, हवालदार शैला धनगर, जनार्दन चौधरी, किशोर महाजन, सुनील वानखेडे, बाळु मराठे, प्रदीप पोळ, अमोल सूर्यवंशी, प्रणेश ठाकुर आदींच्या पथकाने यशस्वी केला.