जळगाव शहर

महापौर महाजन, उपमहापौर पाटलांकडून परिचारिकांचा सन्मान

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ मे २०२१ । महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन व उपमहापौर श्री. कुलभूषण पाटील यांनी पहिल्या महासभेसाठी जाण्यापूर्वी जागतिक परिचारिका दिनानिमित्त आज (12 मे 2021) सकाळी दहाच्या सुमारास सिंधी कॉलनीतील महापालिकेचे कै. चेतनदास मेहता व पंचमुखी हनुमान मंदिराजवळील स्व. श्रीमती नानीबाई सूरजमल अग्रवाल रुग्णालयास भेट दिली.

तसेच सायंकाळी सव्वापाचला मोहाडी रोडवरील शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय व महिला रुग्णालयास महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन यांनी भेट दिली. त्याचप्रमाणे ‘महापौर सेवा कक्ष’च्या माध्यमातून विविध रुग्णालयांशी संपर्क साधण्यात आला. अशा एकूण 142 हॉस्पिटलमधील 1200 हून अधिक परिचारिकांचा भेटकार्ड व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

कै. चेतनदास मेहता रुग्णालयात डॉ. सौ.सुजाता पाटील व डॉ. सौ.ठुसे यांनी महापौर, उपमहापौरांचे स्वागत केले. त्यानंतर महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन व उपमहापौर श्री.कुलभूषण पाटील यांनी तेथील कर्मचार्‍यांची आस्थेवाईकपणे चौकशी करून ‘कोविड-19’च्या पार्श्वभूमीवर करीत असलेल्या कार्याचे कौतुक केले व जागतिक परिचारिका दिनाचे महत्त्व सांगणारे फलक रुग्णालयात लावण्यासाठी भेट दिले. तसेच शोभा कोगटे, हर्षदा शिलेदार, ममता बोदडे, अनिता भदाणे, शबिरा तडवी, लक्ष्मी सरघटे, सुरेखा वडनेरे, मीरा चंडाळे आदी परिचारिकांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून शुभेच्छा दिल्या व सर्वांप्रती कृतज्ञताही व्यक्त केली.

स्व. श्रीमती नानीबाई सूरजमल अग्रवाल रुग्णालयास भेटीवेळी डॉ. सौ.सोनल कुलकर्णी व डॉ. सौ.प्रियंका अत्तरदे यांनी महापौर, उपमहापौरांचे स्वागत केले. त्यानंतर महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन व उपमहापौर श्री.कुलभूषण पाटील यांनी तेथील कर्मचार्‍यांची आस्थेवाईकपणे चौकशी करून ‘कोविड-19’च्या पार्श्वभूमीवर करीत असलेल्या कार्याचे कौतुक केले व जागतिक परिचारिका दिनाचे महत्त्व सांगणारे फलक रुग्णालयात लावण्यासाठी भेट दिले. तसेच शिवानी परदेशी, दीपाली बोरनारे, सीमा परदेशी, सुमन सरताले, वैशाली वंजारी, मंगला दायमा, स्वाती रेखी, भावना भिरूड आदी परिचारिकांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून शुभेच्छा दिल्या.

मोहाडी रोडवरील शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय व महिला रुग्णालयात अधीक्षक डॉ.मिलिंद निकुंभ, डॉ.रितेश पाटील डॉ. प्रवीण पाटील, डॉ. शिल्पा अमोल पाटील, डॉ. शिल्पा पाटील (आयुर्वेद) यांनी महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन यांचे स्वागत केले. यावेळी उभयतांत रुग्णालयातील सोयी-सुविधा, कोविड रुग्णांची केली जात असलेली सुश्रूषा यासंदर्भात चर्चा झाली. त्यानंतर महापौर सौ. महाजन यांनी सविता शिर्के, नम्रता वानखेडे, सोनाली हसबंद, नेहा राजपूत आदी परिचारिकांचा भेटकार्ड व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व परिचारिका दिनाच्या शुभेच्छा दिल्या. महापौरांकडून झालेल्या या छोटेखानी सत्कारामुळे परिचारिकांनी समाधान व्यक्त केले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button