तीन महिन्यात २ गँगवर मोक्का, ८ एमपीडीए आणि तडीपारसह ३ हजारावर गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई
जळगाव लाईव्ह न्यूज | चेतन वाणी | जिल्ह्यात येणाऱ्या प्रत्येक पोलीस अधिकाऱ्याची आपली एक वेगळी पद्धत असते. अवघ्या तीन महिन्यांपूर्वी जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक पदाचा पदभार स्वीकारलेले एम. राज कुमार यांनी आपली वेगळी पद्धत गुन्हेगारांवर अवलंबण्यास सुरुवात केली आहे. गुन्हेगारांना वठणीवर आणायचं आणि गुन्हेगारीला लगाम घालायचा त्यांचा मास्टर प्लॅन चांगलाच प्रभावी ठरत आहे. तीन महिन्यात पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली २ गँगवर मोक्का, ८ गुन्हेगारांवर एमपीडीए आणि तडीपारसह ३ हजारावर गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.
जळगाव जिल्ह्यात गेल्या कार्यकाळात पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंडे यांनी अतिशय प्रभावीपणे आपली छाप सोडली होती. जळगावात त्यांनी निर्माण केलेला जनसंपर्क, कोविड काळात घेतलेली भूमिका, गुन्हेगारांवर केलेल्या कारवाया आणि महत्त्वाचे गुन्हे उघड केल्याने त्यांच्यासह जिल्ह्याची प्रतिमा उंचावली होती. डॉ.मुंडे यांच्या मावळत्या कार्यकाळात राज्यातील सरकारमध्ये झालेली उलथापालथ व त्यामुळे जिल्ह्यात पोलिसांवर होणारे आरोप यातून पोलिसांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत असतानाच डॉ.मुंडे यांची बदली झाली. जळगाव पोलीस अधीक्षक म्हणून एम. राज कुमार यांनी पदभार स्वीकारला.
नवीन अधिकारी कसा असेल याबाबत सुरुवातीला अनेक तर्कवितर्क लढविले जात होते मात्र आता हळूहळू चित्र स्पष्ट होत आहे. एम. राज कुमार यांनी आपली वेगळी शैली जळगावात लागू केली आहे. कोणत्याही दबावाला न जुमानता ते कामाला लागले आहेत. राजकीय पुढारी असो की इतर कुणी सर्वांना ते स्पष्टच उत्तर देतात. एम. राज कुमार हे पदोन्नतीवर असले तरी पुढील किमान सव्वा वर्ष त्यांना जळगावातच राहावे लागणार आहे. आगामी काळातील जिल्हा परिषद, जळगाव मनपा, नगर परिषद, नगर पंचायत, विधानसभा, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी आतापासूनच मास्टर प्लॅन कार्यान्वित केला आहे.
गुन्हेगारांना मोकळीक न देता कायद्याच्या कचाट्यात अडकवण्याचा एम. राज कुमार यांचा फंडा हिट ठरत आहे. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देत मार्गदर्शन ते देतात. शिवाय एखाद्या प्रकरणाचा वैयक्तिक पातळीवर पाठपुरावा देखील करतात. नूतन जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्याशी वैयक्तिक संपर्क साधून एमपीडीए प्रकरणांचा ते आढावा घेतात. अवघ्या तीन महिन्यात पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीच्या माध्यमातून पाठविलेल्या प्रस्तावांपैकी २ गँगला मोक्का लागला तर एमपीडीएच्या १३ पैकी ८ प्रस्तावांना मंजुरी मिळाली आहे.
गेल्या तीन महिन्यात महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५, ५६ आणि ५७ प्रमाणे १५ तडीपार प्रस्तावांना मंजुरी मिळाली आहे तर ४ प्रस्ताव अद्याप प्रलंबित आहेत. गेल्या दोन महिन्यात तब्बल ८ एमपीडीए कारवाया झाल्या असून कारवाईची गती हीच राहिली तर वर्षभरात ‘अब तक छप्पन’चा आकडा सहज गाठला जाईल यात शंका नाही. जिल्ह्यात घडलेले विविध गुन्हे आणि सराईत गुन्हेगारांपैकी तीन महिन्यात ३२९६ गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. एलसीबीचे निरीक्षक किसनराव नजनपाटील यांच्याकडे प्रतिबंधात्मक कारवाई करून गुन्हेगारांना सक्त ताकीद दिली जाते. प्रतिबंधात्मक कारवाईचा बहुतांशी गुन्हेगारांवर चांगला प्रभाव पडतो
पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांच्या मास्टर प्लॅनमध्ये हिस्ट्रीशिटरची भली मोठी यादीच असून त्यात जळगावातील सध्याचे काही पांढरपेशे मंडळी देखील आहेत. जुन्या गुन्ह्यांच्या यादीत एखाद्या नव्या गुन्ह्याची भर पडली की लागलीच फाईल तयार होणार हे निश्चित आहे. मातब्बर पुढारी, वाळू माफिया, झोपडपट्टी दादा, अट्टल गुन्हेगार, लहान मोठे गल्ली गँगस्टर पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांच्या रडारवर असून येत्या वर्षभरात टप्प्याटप्प्याने त्यांचा ‘करेक्ट कार्यक्रम’ होणार हे नक्कीच आहे.