जळगाव लाईव्ह न्यूज । १५ मार्च २०२३ । घरात आंघोळीसाठी हिटर लावलेले पाणी घेत असताना तेरा वर्षीय मुलाला हिटरचा शॉक लागला. मुलाचा आरडाओरडा ऐकून धावून आलेल्या शेजारच्या १२ वर्षीय मुलीने धाडस दाखविले आणि वीजपुरवठा बंद केला. त्यामुळे मुलाचे प्राण वाचले. मुलाचा जीव वाचवणारी ही मुलगी त्याच्यासाठी जणू देवदूत ठरल्याचे दिसून आली.
ही थरारक घटना चाळीसगाव शहरातील संजय गांधी नगरात मंगळवारी घडली. सागर सपकाळे (वय १३ वर्ष) असे प्राण वाचलेल्या मुलाचे नाव आहे. तर त्याच्यासाठी देवदूत ठरलेल्या मुलीचे नाव सिद्धी गायके (वय १२ वर्ष) असे आहे. सिद्धी हिने दाखविलेल्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
चाळीसगाव शहरातील संजय गांधीनगरातील रहिवासी सागर सपकाळ हा आठवीत शिकणारा मुलगा आजी व आईसोबत राहतो. त्याचे पितृछत्र हरपले असून आई धुणीभांडी व मोलमजुरी करुन कुटुंबाचा चरितार्थ चालवते. सागरची आई नेहमीप्रमाणे सकाळी घरुन कामासाठी गेल्यानंतर सागर घरात एकटाच होता. आंघोळीसाठी हिटरमधून पाणी काढण्यासाठी तो गेला असता, त्याचा अचानक हिटरचा शॉक लागला.
यावेळी सागरने जोरजोरात आरडाओरडा केला. हा आवाज सागरच्या शेजारी राहत असलेल्या सिद्धी गायके या मुलीच्या कानी पडला व ती आवाजाच्या दिशेने धावत सुटली. विजेचा धक्का बसल्यावर काय उपाययोजना करावयाचे याचे धडे सिद्धी हिला शाळेत मिळाले होते. त्यानुसार प्रसंवधान राखत सिध्दी हिने तात्काळ धाडस दाखवत घरात प्रवेश केला. सागरला ज्या ठिकाणी विजेचा धक्का लागला होता, तेथे जाऊन सर्वप्रथम त्याठिकाणचा वीजपुरवठा बंद केला.
वीजपुरवठा बंद केल्यावर सागर जमिनीवर कोसळला.त्याला आजूबाजूच्या लोकांनी लगेचच दवाखान्यात उपचारार्थ दाखल केले. सुदैवाने सिद्धीने वेळीच विद्युत पुरवठा बंद केल्यामुळे अनर्थ टळला गेला. सिद्धीने स्वत:च्या जीवाची पर्वा न करता, दाखविलेले प्रसंगवधान व धाडसाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.