कोरोना आणि त्यानंतर आलेले लॉकडाऊन याबाबत प्रत्येकाचे अत्यंत वाईट अनुभव आहेत. या काळात काहींनी आपल्या जिवलगांना गमावले. काहींनी रोजगार गमावला. एकूणच हा कालखंड सगळ्यांसाठीच अत्यंत खडतर आणि कसोटीचा होता. मुंबईसारख्या गतिमान शहरातील सगळ्या यंत्रणा ठप्प झाल्याचा अनेकांच्या आयुष्यातील बहुधा हा पहिलाच अनुभव असावा. या काळातील आपलं जगणं चित्रपटाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न यापूर्वीही झाला होता. आता पुन्हा एकदा असाच एक चित्रपट येऊ घातला आहे. ‘भीड’ असे या चित्रपटाचे नाव असून दिग्दर्शक अनुभव सिंह हे हा चित्रपट मोठ्या पडद्यावर आणणार आहेत.
बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव आणि भूमी पेडणेकरच्या ‘भीड’ या सिनेमाचा ट्रेलर आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला असून ते आता सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला त्या काळात लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. २०२० मध्ये सरकारला संपूर्ण देशात लॉकडाऊन करणे भाग पडले. जवळपास दीड वर्ष लोक त्यांच्या घरातच होते. लॉकडाऊनचा हा वाईट टप्पा मोठ्या पडद्यावर चित्रित करण्याची जबाबदारी दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांनी घेतली आहे. नुकताच त्याचा ट्रेलर समोर आला आहे. निर्मात्यांनी हा ट्रेलर ब्लॅक अँड व्हाईट मध्ये प्रेक्षकांसमोर ठेवला आहे. २ मिनिटे ३९ सेकंदांचा ट्रेलर प्रेक्षकांना फारच भावला आहे.
ट्रेलरची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घोषणेने होते. वाढत्या साथीच्या पार्श्वभूमीवर ते देशातील लॉकडाऊनची घोषणा करतात. यानंतर या ट्रेलरमध्ये एकामागून एक लॉकडाऊन दरम्यान लोकांच्या रडण्याची दृश्ये दाखवण्यात आली आहेत. या ट्रेलरमध्ये कोरोनाकाळ, त्यावेळची परिस्थिती, कोरोनाकाळात सामान्य माणसांना भेडसावणाऱ्या समस्या अशा अनेक गोष्टींवर प्रकाश टाकण्यात आला आहे. लॉकडाऊन काळात वेगवेगळ्या शहरात अडकलेल्या लोकांना घरी परतण्यासाठी मोठाच संघर्ष करावा लागला होता. कोरोनाकाळात सरकार आणि व्यवस्थेची भूमिका काय होती हे या सिनेमात दाखवण्यात येणार आहे.
‘भीड’ या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा अनुभव सिन्हाने सांभाळली आहे. लॉकडाऊनच्या तीन वर्षांनंतर २४ मार्च २०२३ रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. राजकुमार राव आणि भूमी पेडणेकरसह पंकज कपूर, दिया मिर्झा, आशुतोष राणा, कृतिका कामरा, वीरेंद्र सक्सेना आणि आदित्य श्रीवास्तव यांच्या यात महत्त्वाच्या भूमिका आहेत. अनुभव सिन्हा यांनी यापूर्वी ‘गुलाब गँग’ आणि ‘मुल्क’ सारखे अनेक अप्रतिम चित्रपट दिले आहेत.
‘भीड’ हा सिनेमा मोनोक्रोम फिल्टरमध्ये बनवण्यात आला आहे. प्रेक्षकांना पुन्हा एकदा सिनेमागृहाकडे वळवण्यात हा सिनेमा यशस्वी होईल, अशी आशा आहे. राजकुमार रावने या सिनेमाचा ट्रेलर शेअर केला आहे. ट्रेलर शेअर करत त्याने लिहिलं आहे, “देशासमोरील सर्वात वाईट काळ… आता ट्रेलर आऊट झाला आहे”.
‘भीड’ सिनेमाबद्दल बोलताना दिग्दर्शक अनुभव सिन्हा म्हणाला,”भीड’ हा सिनेमा माझ्यासाठी खूपच खास आहे. पुन्हा एकदा कोरोनाकाळ दाखवण्यासाठी या सिनेमाच्या प्रत्येक गोष्टीवर आम्ही खूप मेहनत घेतली आहे. समाजातील अनेक गोष्टी या सिनेमात दाखवण्यात येणार आहेत. ‘भीड’ हा भावनिक सिनेमा असून प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडणारा सिनेमा आहे”.
लॉकडाऊनच्या काळात लोकांना दोन वेळचे जेवण मिळणे कठीण झाले होते. हाताला काम नाही, खायला अन्न नाही, या परिस्थितीत लोकांनी कसे दिवस काढले, याचे उत्तम सादरीकरण या चित्रपटात दिसते. लॉकडाऊन हा लोकांच्या आयुष्यातील हा एक असा काळ होता, जो कदाचित जगात कोणीही विसरू शकत नाही.