⁠ 
गुरूवार, मे 9, 2024

मोठी बातमी : तत्कालीन विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज | २६ फेब्रुवारी २०२३ | निलेश भोईटे यांच्या घरावर अवैध छापा टाकल्याच्या प्रकरणात शहर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात तत्कालीन सरकारी वकील अ‍ॅड. प्रवीण चव्हाण यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, याच गुन्ह्यात चव्हाण यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

मविप्र संस्थेतील वादाच्या प्रकरणात अ‍ॅड. विजय पाटील यांचे अपहरण करुन त्यांच्याकडे खंडणी मागितल्याप्रकरणी पुणे येथील कोथरुड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी डेक्कन पोलिसांच्या पथकाने निलेश भोईटे यांच्या घरावर छापा टाकला होता. यावेळी संशयितांनी भोईटे यांच्या घरात अनिधिकृतपणे प्रवेश करीत दस्तऐवज दाखल करायचे आणि पोलीसांच्या छाप्यात हस्तगत झाले असे दाखवायचे. तसेच त्यांच्या घरात सूरा ठेवून असा कट रचून वर्तमानपत्रांच्या प्रतिनिधींना खोटी माहिती दिली होती. तसेच निलेश भोईटे यांच्या घरातील महत्वाचे दस्ताऐवज प्रोसेडिंग बुक, रबरी शिक्के, बँकेचे पासबुक, लेटरपॅड हे महत्वाचे दस्तावेज संशयितांनी त्यांच्या घरात अनधिकृतपणे प्रवेश करुन बनावटीकरण करण्यासाठी घेवून गेल्याप्रकरणी दि.७ ऑक्टोंबर २०२२ रोजी शहर पोलिसात निलेश भोईटे यांनी तक्रार दिली होती.

भोईटे यांच्या या तक्रारीवरुन अ‍ॅड. विजय भास्कर पाटील व हेमंतकुमार साळुंखे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या गुन्ह्याचा तपास करीत असतांना तक्रारदाराच्या पुरवणी जबाब आणि गुन्ह्याचा तपासीअंती यामध्ये संशयित तत्कालीन सरकारी वकील अ‍ॅड. प्रवीण चव्हाण, महेश आनंदा पाटील, संजय भास्कर पाटील, मनोज भास्कर पाटील, जयेश भोईटे आणि सुनील दत्तात्र्य माळी या संशयिताची नावे वाढविण्यात आली आहे. अर्थात, या प्रकरणात अ‍ॅड. प्रवीण चव्हाण यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

रविवारी चाळीसगाव येथे दाखल खंडणीच्या असलेल्या गुन्ह्यात प्रवीण चव्हाण हे चाळीसगाव येथे आले असता शहर पोलिसात दाखल गुन्ह्यात त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. चाळीसगाव येथून चव्हाण यांना जळगाव शहर पोलीस ठाणे येथे आणण्यात आले आहे.

चाळीसगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक बिरारी, उपनिरीक्षक सुहास आव्हाड, भूषण पाटील, निलेश पाटील, विनोद खैरनार, ज्ञानेश्वर गीते, रविंद्र बच्छे यांच्या पथकाने प्रवीण चव्हाण यांना जळगाव शहर पोलिसांच्या ताब्यात दिले. चव्हाण यांची बंदद्वार चौकशी करण्यात येत आहे.