जळगाव लाईव्ह न्यूज । ५ फेब्रुवारी २०२३ । बीएचआर प्रकरणी दाखल गुन्ह्यात जामिनासाठी मदतीचे आश्वासन देत खंडणी मागितल्याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याच्या तपासासाठी स्थापन एसआयटी पथक रविवारी सकाळपासून चाळीसगावात ठाण मांडून आहे. पथकाकडून एका ट्रॅव्हल्स एजन्सीमध्ये चौकशी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी (BHR) प्रकरणात जामिनासाठी मदत करण्याचे आश्वासन देऊन तब्बल १ कोटी २२ लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी तत्कालीन सरकारी वकील अॅड. प्रवीण चव्हाण, शेखर सोनाळकर यांच्यासह चाळीसगावचे उदय पवार यांच्याविरुद्ध सूरज सुनील झंवर यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. पुण्यात दाखल या गुन्ह्याचे ठिकाण चाळीगाव असल्याने गुन्हा चाळीसगाव पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला. या प्रकरणी पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी विशेष पथक गठीत एसआयटी गठित केली आहे.
पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तपासाला सुरुवात केली आहे. पथकाकडून सुनील झंवर, सूरज झंवर, दीपक ठक्कर, तेजस मोरे, आयुष मणियार, विशाल पाटील यांचे जाबजबाब नोंदविले होते. तसेच गुन्ह्याच्या अनुषंगाने कागदपत्रांची पडताळणी देखील केली आहे. संशयितांच्या शोधार्थ पथक वेगवेगळ्या जिल्ह्यात आणि तालुक्यात देखील जाऊन आले मात्र अद्याप कुणीही हाती आलेले नाही. गुन्ह्यात आणखी इतर कुणाचा सहभाग आहे का याचा देखील शोध घेणे पथकाकडून सुरू आहे.
रविवारी सकाळी ७ वाजेपासून एसआयटीचे पथक चाळीसगावात ठाण मांडून बसले आहे. पथकाचे प्रमुख पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगाव येथील एका ट्रॅव्हल्स एजन्सीमध्ये चौकशी केली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून काही दस्तऐवज पुणे येथे पाठविल्याची माहिती पथकाला मिळाली असून त्यादृष्टीने तपास केला जात आहे.