जळगाव लाईव्ह न्यूज । २२ जानेवारी २०२३ । क्रेडीट कार्डवर ५ हजार रूपयांचे ऑनलाईन शॉपींग व्हाऊचरची ऑफर असल्याचे सांगून सायबर ठगाने मंगरूळ येथील २३ वर्षीय तरूणाच्या क्रेडीट कार्डचा ओटीपी जाणून घेवून ७ लाख ६० हजार रूपयांचा ऑनलाईन गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत शुक्रवारी सायबर पोलिस ठाण्यात सायबर ठगाविरूध्द गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
मंगरूळ येथील मिलिंद प्रकाश पाटील याने डिसेंबर महिन्यात क्रेडीट कार्डसाठी ऑनलाईन अप्लाय केला होता. काही दिवसांनी तरूणाला क्रेडीट कार्ड प्राप्त झाल्यानंतर १८ जानेवारी रोजी एका मोबाईल क्रमांकावरून कॉल आला. त्या व्यक्तीने पर्सनल लोनसाठी विचारपूस केली. मात्र, तरूणाने नकार देवून कॉल कट केला. पुन्हा त्याच क्रमांकावरून १९ जानेवारी रोजी दुपारी १२.१९ वाजता कॉल आला आणि तुमच्या क्रेडीट कार्डवर ५ हजार रूपयांचे ऑनलाईन शॉपींग व्हाऊचरची ऑफर दिली असून व्हाऊचर वापरण्यासाठी मोबाईलवर पाठविला ओटीपी क्रमांक सांगावे, असे सांगण्यात आले. तरूणाने समोरील व्यक्तीची संपूर्ण जाणून घेवून खात्री झाल्यानंतर ओटीपी क्रमांक सांगितला.
लोनची मागणी नाही, तरीही रक्कम आली…
कॉलवरील व्यक्तीला ओटीपी क्रमांक सांगितल्यावर तरूणाला काही मिनिटांनी एक मेसेज प्राप्त झाला. त्यात बँक खात्यातून रक्कम डेबिट झाल्याचा उल्लेख होता. तरूणाने लागलीच बँक गाठून संपूर्ण प्रकार सांगितल्यावर त्याच्या खात्यावर १८ जानेवारीला पर्सनल लोन क्रेडीट झाले असून ही रक्कम पश्चिम बंगाल येथील पवन कुमार नावाच्या व्यक्तीच्या खात्यावर ट्र्रान्सफर झाल्याचे बँकेकडून सांगण्यात आले. त्यावेळी तरूणाने आपण कुठलेही लोनसाठी अप्लाय केले नसल्याचे बँकेच्या अधिका-याला सांगितले. दरम्यान, सायबर भामट्याने तरूणाच्या बँक खात्यातील ९० हजाराच्या रक्कमेवर सुध्दा डल्ला मारल्याची बाब समोर आली. अखेर शुक्रवारी तरूणाने सायबर पोलिस ठाणे गाठून संपूर्ण हकीकत पोलिसांना सांगितली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.