⁠ 
रविवार, मे 19, 2024

पतंग उडवतांना विहिरीत पडल्याने १० वर्षाच्या बालकाचा मृत्यू ; जळगावातील दुर्दैवी घटना

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ जानेवारी २०२३ । सणासुदीच्या दिवशी जळगाव जिल्ह्यात एक दुर्देवी घटना समोर आलीय. पतंग उडवतांना विहिरीत पडल्याने १० वर्षाच्या बालकाचा मृत्यू झाल्याची घटना धरणगाव तालुक्यातील हिंगोणे येथे घडलीय. अक्षय संजय महाजन (माळी ) असे या मृत बालकाचे नाव असून या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

नेमकी काय आहे घटना?

आज मकर संक्रांती निमित्त सर्वत्र पतंगोत्सव साजरा केला जात आहे. दरम्यान, जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील हिंगोणे येथे एक दुर्घटना घडली. येथे मूळचे अमळनेर तालुक्यातील रहिवासी असलेले महाजन (माळी) कुटुंब उदरनिर्वाहानिमित्त स्थायिक झालेले आहे. याच कुटुंबातील अक्षय संजय महाजन (माळी ) हा बालक आज पतंग उडवत होता. याप्रसंगी त्याचा तोल जाऊन तो विहिरीत पडला. यामुळे त्याचा मृत्यू झाला.

अक्षय माळी हा पाचवीत शिकत होता. तो विहिरीत पडल्याचे कळताच परिसरातील लोकांनी धाव घेऊन त्याला बाहेर काढले. मात्र, तोवर त्याची प्राणज्योत मालविली होती. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तर हिंगोणे आणि कळमसरे गावावर यामुळे शोककळा पसरली आहे. मुलांनी पतंग उडवतांना सावधगिरी बाळगण्याची गरज असल्याचे यातून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.