वंदे मातरम् बहुउद्देशीय संस्थेतर्फे आव्हाणे येथे नेत्र तपासणी शिबीराचे आयोजन
जळगाव लाईव्ह न्यूज । ६ जानेवारी २०२३ । गरीब, निर्धन आणि दुर्बल घटकातील रुग्णांना मोतीबिंदूची शस्त्रक्रिया आणि डोळ्याच्या विकारावरील वैद्यकीय उपचार मोफत सुविधा मिळावी यासाठी शासनातर्फे”मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र” हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. याअंतर्गत जळगाव तालुक्यातील आव्हाणे येथे सर्वसामान्य नागरिकांसाठी भव्य नेत्र तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उदघाटन दुध संघाचे संचालक तथा जी. एम. फाऊंडेशन चे अरविंद देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी वंदे मातरम् बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा प्रियंका हर्षल चौधरी, माजी पंचायत समिती सदस्य अॅड. हर्षल प्रल्हाद चौधरी व आव्हाने गावातील ग्रामस्थ उपस्थित होते. आयोजित शिबिरात एकूण १२५ व्यक्तींची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये २२ रुग्णांना मोतीबिंदू, १ रुग्णास नासूर तर एक रुग्णाच्या डोळ्यावर भुरी आल्याचे निदान डॉक्टरांनी तपासणीअंती केले असून एकूण २८ रूग्णांना चष्मा ची आवश्यकता असून त्यांना वाटप केले जाणार आहे.
या शिबिराचे आयोजन वंदे मातरम् बहुउद्देशीय संस्था, आव्हाणे व प्रतिभा हाॅस्पीटल, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. या शिबिराचे आयोजन केल्यामुळे अनेक गरीब वृद्ध नागरिकांना फायदा झाला असून त्यांनी आयोजकांचे आभार मानले आहेत.