जळगाव लाईव्ह न्यूज । ०६ मे २०२१ । शेताबाहेर दुचाकीसह उभ्या असलेल्या शेतकऱ्याला विरुद्ध दिशेने सुसाट आलेल्या डम्परने चिरडल्याची घटना जळगाव तालुक्यातील धानवड शिवारात बुधवारी घडली. या घटनेत शिवाजी काळू पाटील (वय ६५, रा.धानवड, ता.जळगाव) या शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, या घटनेनंतर चालकाने डम्पर सोडून पळ काढला.
तालुक्यातील धानवड येथील शिवाजी काळू पाटील हे कुटुंबीयांसह जळगाव शहरात मेहरुण परिसरात वास्तव्यास होते. बुधवारी ते धानवड येथे भावाकडे आले होते. त्यानंतर, नेहमीप्रमाणे ते शेतात गेले होते. दुपारच्या सुमारास शेताला लागून असलेल्या रस्त्यावर दुचाकी (क्र.एमएच 19 बीसी6230) जवळ उभे असताना विरुद्ध दिशेने सुसाट येणाऱ्या डम्परने (क्र.जी.जे.१८अे.यु.७५६०) दुचाकीसह शेतकऱ्याला फरफटत शेतात नेले.
यात शिवाजी पाटील गंभीर जखमी झाल्याने, तशाच अवस्थेत ट्रकवरील चालक सोनु ऊर्फ नितीन अरुण गोडसे आणि त्याचा साथीदार दोघांनी धूम ठोकली. जखमीला ग्रामस्थांनी उपचारार्थ जळगावात हलविले. उपचार सुरू असताना सायंकाळी त्यांचा मृत्यू झाला. एमआयडीसी पोलीस ठाण्यात ट्रकचालकाच्या विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.