जिल्ह्यात उद्यापासून जेष्ठांना मिळणार लस, ७१ हजार लसींचा पुरवठा
जळगाव लाईव्ह न्यूज । ०५ मे २०२१ । जळगाव जिल्हयात ४५ वर्षावरील नागरिकांसाठी ७१ हजार लशींचा पुरवठा उपलब्ध झाला असून उद्यापासून (ता.६) जिल्ह्यात नागरिकांना लसी होतील. उपलब्ध लशीमध्ये ५६ हजार ६०० कोविशिल्ड तर १४ हजार ५०० कोव्हॅक्सीन लसी आहेत.
दरम्यान गेल्या चार दिवसात १८ ते ४४ वयोगटातील जिल्ह्यातील २ हजार ८४१ नागरीकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. लसीकरणासाठी या वयोगटातील नागरीकांनी कोविन ॲपवर नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात १६ जानेवारीस कोरोना लसीकरणाचा जिल्हास्तरीय शुभारंभ झाला. पहिल्या सत्रात आरोग्य सेवकांचे लसीकरण सुरु केले. त्यानंतर ५ फेब्रुवारीपासून फ्रंटलाईन वर्कर्स आणि ४५ वर्षावरील कोमॉर्बिड व्यक्ती व ज्येष्ठ नागरीकांचे लसीकरण सुरु करण्यात आले होते. तर १ एप्रिलपासून जिल्ह्यातील ४५ वर्षावरील सर्व नागरीकांचे लसीकरण सुरु करण्यात आले असून लसीच्या उपलब्धतेनुसार जिल्हा रुग्णालय, उप जिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये, सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रासह काही खाजगी रुग्णालयात नागरीकांना कोरोनाची लस देण्यात येत आहे.
दरम्यान, कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी लस महत्वपूर्ण असल्याने राज्य शासनाने १ मे पासून राज्यातील १८ ते ४४ वयोगटातील सर्व नागरीकांचे मोफत लसीकरणाचा निर्णय घेतला आहे. जळगाव जिल्ह्यात कोविन ॲपवर नोंदणी केलेल्या नागरीकांसाठी जिल्ह्यात रेडक्रॉस सोसायटी, रोटरी भवन, जळगाव शहर महानगरपालिकेचे शाहू महाराज रुग्णालय व नानीबाई आरोग्य केंद्र आणि प्राथमिक आरोग्य केंद्र, नशिराबाद अशी एकूण पाच केंद्र सुरु केली आहेत. १८ ते ४४ वयोगटात मर्यादित स्वरूपात व फक्त आगाऊ ऑनलाइन नोंदणीद्वारे लसीकरण सुरू आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत २ लाख ४८ हजार ९९८ नागरीकांना कोरोना लसीचा पहिला डोस तर ५९ हजार १०८ नागरीकांना दुसरा डोस देण्यात आला आहे.