⁠ 
शुक्रवार, जानेवारी 10, 2025
Home | जळगाव जिल्हा | अमळनेर | सिनेस्टाईल पाठलाग करून ८ लाखांचा गांजा जप्त, अमळनेर पोलिसांची कारवाई

सिनेस्टाईल पाठलाग करून ८ लाखांचा गांजा जप्त, अमळनेर पोलिसांची कारवाई

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ नोव्हेंबर २०२२ । रात्रीच्या गस्तीत मिळालेल्या माहितीवरून अमळनेर पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून  ८ लाख रुपये किमतीचा ५३ किलो गांजा आणि अडीच लाखाची चारचाकी तसेच दीड लाखाची मोटरसायकल ,मोबाईल सह असा एकूण १२ लाख १० हजार रुपयांचा माल पोलिसांनी १८ रोजी पहाटे १ वाजेच्या सुमारास जळोद रोड वरून जप्त केला आहे. या प्रकरणी आरोपींवर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलीस निरीक्षक जयपाल हिरे हे १७ नोव्‍हेंबरच्‍या रात्री गस्त घालत असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली. जळोद–अमळनेर रस्त्यावरून एक चारचाकीमध्ये गांजा विक्रीसाठी अमळनेर शहरात आणला जात आहे. हिरे यांनी तात्काळ डीवायएसपी राकेश जाधव यांना माहिती देऊन हेडकॉन्स्टेबल किशोर पाटील, मिलिंद भामरे, दीपक माळी, रवींद्र पाटील, सूर्यकांत साळुंखे, चालक सुनील पाटील यांना घेऊन जळोद रस्त्यावर विजयनाना कृषी महाविद्यालयाजवळ सापळा लावला.

मध्‍यरात्रीनंतर १८ नोव्‍हेंबरच्‍या पहाटे १ वाजेच्या सुमारास एक पांढरी कार आणि त्याच्या पुढे मोटरसायकल येताना दिसली. यामुळे पोलिसांनी त्यांना अडवण्यासाठी यंत्रणा सतर्क करताच कार चालक आणि मोटरसायकल चालक यांनी वाहने वळवून उलट्या दिशेने पळू लागले. पोलिसांनी देखील लागलीच वाहनात बसून त्यांचा पाठलाग सुरू केला. बचावासाठी आरोपीनी आपली वाहने नन्दगाव रस्त्याला वळवली. आरोपीना आपण पोलिसांच्या तावडीत सापडू याची जाणीव झाल्याने त्यांनी चारचाकी खड्ड्यात टाकली आणि तेथून उतरून पळ काढला.

पोलीस वाहनाच्या प्रकाशात कारमधून उतरणारा आरोपी सराईत गुन्हेगार तौफिक शेख मुशिरोद्दीन (रा. गांधलीपुरा) हा असल्याची ओळख पटली. त्याच्यासोबत आणखी तीन अनोळखी आरोपी देखील पळून गेले. पोलिसांनी कारची डीक्की उघडली असता त्यात तीन गोण्यांमध्ये ८ लाख २ हजार ५०० रुपये किमतीची ५३ किलो ५०० ग्रॅम वजनाची २५ गांजाची पाकिटे आढळून आली. तसेच आरोपीनी सोडून दिलेली मोटरसायकल, दोन मोबाईल असा एकूण १२ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. हेडकॉन्स्टेबल संदेश पाटील ,पोलीस नाईक शरद पाटील ,शेखर साळुंखे ,सिद्धांत शिसोदे ,उदय बोरसे यांच्या मदतीने शासकीय पंच बोलावून भल्या पहाटे पंचनामा करून तौफिक शेख सह अज्ञात तीन आरोपींवर अमली पदार्थ विरोधी (एनडीपीएस) कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस निरीक्षक जयपाल हिरे करीत आहेत.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.