जळगाव लाईव्ह न्यूज । १५ ओक्टोबर २०२२ । एकीकडे ऑक्टोबर महिना अर्धा उलटला तरीही राज्यात मान्सूनचा पाऊस बरसतोच आहे. राज्यातील अनेक ठिकाणी अद्यापही पाऊस कोसळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचीही चिंता वाढवली आहे. शुक्रवारी देखील राज्यातील विविध भागात गडगडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. अशातच आज देखील राज्यातील काही भागात पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
हवामान खात्याने आज शनिवार आणि उद्या रविवार असे दोन्ही दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांत पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आलीय. पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, पुणे आणि सातारा तसंच कोकणातील काही भागात पुढचे दोन दिवस पावसाची शक्यता आहे. पुणे हवामान विभागाने याबाबतची अंदाज वर्तविला आहे.
दरम्यान, परतीच्या पावसानं पिकांचं मोठं नुकसान झालंय. हातातोंडाशी आलेला घास हिरावल्यानं शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. सोयाबीन, कापूस, मूग, यासह भाजीपाला आणि द्राक्ष पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. परतीच्या या पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांचे वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याचे निर्देश कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.
दरम्यान, राज्यातून 20 ऑक्टोबरपर्यंत पाऊस पूर्णपणे माघार घेऊ शकतो, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्रात शनिवारपासून पावसाचा जोर कमी होईल. तर दिवाळीदरम्यान मुंबई आणि दक्षिण कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकेल.