⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | जळगाव जिल्हा | मुक्ताईनगरची सभा ‘फ्लॉप’ पण मुख्यमंत्र्यांचे भाषण ‘हिट’

मुक्ताईनगरची सभा ‘फ्लॉप’ पण मुख्यमंत्र्यांचे भाषण ‘हिट’

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ सप्टेंबर २०२२ । मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे हे पहिल्यांदा जळगावच्या दौऱ्यावर आले होते. एकनाथराव खडसेंच्या बालेकिल्ल्यात मुक्ताईनगरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या जाहीर सभेचं आयोजन करण्यात आले होते. आ.चंद्रकांत पाटील यांच्यासाठी प्रतिष्ठेचा विषय असताना मुख्यमंत्र्यांच्या भाषणाआधीच लोक सभेतून उठून जायला लागले. लोक निघून जात असल्याचं पाहून गुलाबराव पाटील यांनी त्यांचं भाषण आवरतं घेतलं. गिरीश महाजन यांनाही कार्यकर्ते निघून जात असल्यामुळे भाषण आवरतं घ्यावं लागलं. गिरीश महाजन यांनीही जात असलेल्या कार्यकर्त्यांना थांबण्याची विनंती केली, मात्र बऱ्याच खुर्च्या रिकाम्या झाल्या. गर्दी कमी झाली तरी मुख्यमंत्र्यांचे भाषण मात्र हिट ठरले.

मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पहिल्यांदा जळगावात आले होते. मुक्ताईनगर येथे सभेत संबोधित करताना, वेळ फार कमी आहे. आमच्या माता भगिनींना घरी जायचं आहे, त्यांची चलबिचल दिसत आहे. त्यामुळे गुलाबरावांनी भाषण आटोपतं घेतलं, मी पण आटोपतं घेतो, असं गिरीश महाजन म्हणाले.

ना.महाजन यांच्या अगोदर ना.गुलाबराव पाटील यांनी देखील आपले भाषण आटोपते घेतले होते. नागरिक विशेषतः महिला सभामंडप सोडून परत निघाले होते तर कार्यकर्ते त्यांना थांबण्याची विनंती करीत होते.

प्रमुख नेत्यांनी भाषण आटोपतं घेतल्यानंतर अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषणाला सुरूवात केली. ‘इथे आणलेली माणसं भाड्याने आणलेली नाहीत. अपक्ष आमदार असतानाही इतका जनसमुदाय आला आहे,’ असं एकनाथ शिंदे भाषणाच्या सुरूवातीलाच म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आ.एकनाथ खडसे यांच्यावर टीका करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, चंद्रकांत मला अनेकदा भेटायचा आणि रडायचा, मी ऐकून घ्यायचो, कारण ऐकणारा मी एकटाच होतो. आता तुला घाबरायची गरज नाही. हा खरा एकनाथ तुझ्यामागे खंबीरपणे उभा आहे. एका आमदाराला संपवण्याचा प्रयत्न केला गेला. आधीचे एकनाथ हात धरून मागे लागले होते, मात्र हा एकनाथ हात धरून चालेल,’ असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी चंद्रकांत पाटील यांना दिला.

author avatar
चेतन वाणी
पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.