⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024
Home | जळगाव जिल्हा | मुक्ताईनगर | Big Breaking : जिल्हाप्रमुख पदावरून आ.चंद्रकांत पाटील यांची उचलबांगडी!

Big Breaking : जिल्हाप्रमुख पदावरून आ.चंद्रकांत पाटील यांची उचलबांगडी!

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Muktainagar News । जळगाव लाईव्ह न्यूज । १ ऑगस्ट २०२२ । राज्यात शिवसेना पक्ष फुटल्यानंतर पक्षांतर्गत अनेक फेरबदल होत आहे. बंडखोरांच्या गटात सामील झालेले शिवसेना जिल्हाप्रमुख पदावरून मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील (MLA Chandrakant Patil) यांची उचलबांगडी करण्यात आली असून त्यांच्या जागी माजी जि.प. सदस्य दीपकसिंग राजपूत यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

जळगाव जिल्ह्यातील शिवसेना दुभंगली असून सर्वच्या सर्व चार आमदार आणि पक्षाला पाठींबा दिलेले पाचवे आमदार चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ शिंदे यांच्या गटाकडे धाव घेतली आहे. जळगाव जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते देखील शिंदे गटात दाखल झाले आहेत. गेल्या महिन्यात जिल्ह्यात आलेले संपर्क प्रमुख संजय सावंत यांनी लवकरच बंडखोरांवर कारवाई करणार असल्याचे सांगितले होते. या पार्श्‍वभूमिवर, अद्यापपर्यंत जळगाव जिल्ह्यातील पदाधिकार्‍यांना बदलण्यात आले नव्हते. आता मात्र जिल्ह्यातील पदाधिकारी बदलण्यात येणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्याकडे आधी असणारी शिवसेना जिल्हाप्रमुखपदाची धुरा आता माजी जिल्हा परिषद सदस्य दीपकसिंग राजपूत यांच्याकडे देण्यात आली आहे. दैनिक सामनामध्ये याबाबतची माहिती जाहीर करण्यात आली आहे. राजपूत यांच्याकडे जामनेर, मुक्ताईनगर आणि रावेर या तीन तालुक्यांची जबाबदारी टाकण्यात आलेली आहे. राजपूत हे शिवसेनेचे निष्ठावंत पदाधिकारी असून त्यांनी उध्दव ठाकरे यांच्या सोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे त्यांच्यावर शिवसेना जिल्हाप्रमुख पदाची महत्वाची जबाबदारी टाकण्यात आल्याचे मानले जात आहे.

जिल्ह्यात झालेल्या या फेरबदलमुळे आ.चंद्रकांत पाटील यांना मोठा धक्का मानला जात असून जिल्ह्यातील इतर देखील पदाधिकाऱ्यांच्या गटात खळबळ उडाली आहे. येत्या काळात अनेकांची उचलबांगडी केली जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

author avatar
चेतन वाणी
पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.