जळगाव लाईव्ह न्यूज । २७ जुलै २०२२ । शिवसेना पक्षात सध्या मोठी फूट पडली असून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे विरुद्ध मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अशी गटबाजी पाहायला मिळत आहे. शिंदे आणि ठाकरेंमध्ये मोठ्याप्रमाणात वितुष्टता आली असून सध्या शिवसेना कुणाची यावरूनच वाद सुरु आहे. आज दि.२७ जुलै रोजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस असून त्यानिमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जळगावचे माजी पालकमंत्री आ.गुलाबराव पाटील यांनी देखील सोशल मीडियाद्वारे शुभेच्छा दिल्या आहे. तिघांच्या शुभेच्छांमध्ये देखील फरक आहे. शिंदे आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांचा पक्षप्रमुख म्हणून उल्लेख टाळला आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा आज वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी कालपासूनच मातोश्रीवर कार्यकर्त्यांची रांग लागली आहे. ढोलताशे वाजवत शिवसैनिकांकडून (Shivsena) त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जात आहे. विशेष म्हणजे यंदा पहिल्यांदाच उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा गुच्छ देण्याऐवजी प्रतिज्ञापत्रांची भेट दिली आहे. राज्यभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. राजकारण, उद्योग जगत, सामाजिक क्षेत्र, बॉलिवूडमधूनही त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जळगावचे माजी पालकमंत्री आ.गुलाबराव पाटील यांनी देखील सोशल मीडियाद्वारे शुभेच्छा दिल्या आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आ.गुलाबराव पाटील यांनी फेसबुकद्वारे शुभेच्छा दिल्या असल्या तरी त्या पोस्टवरील कमेंट्स मात्र बंद करून ठेवण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तर दि.२६ जूनपासून कमेंट्स बंद केल्या आहेत तर आ.गुलाबराव पाटील यांनी मात्र दोन दिवसापूर्वी कमेंट्स बंद केल्या आहेत. शिवसेनेतून बंडखोरी केल्यानंतर नेत्यांना आणि आमदारांना शिवसेना समर्थकांच्या रोषाला सामोरे जावे लागत असून वारंवार गद्दार अशा कमेंट्सचा वर्षाव होत आहे. काही समर्थक तर अतिशय खालच्या भाषेत टीका करीत असल्यानेच या कमेंट्स बंद करण्यात आल्या असाव्या असे म्हटले जाते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुभेच्छा देताना उद्धव ठाकरे यांचा पक्षप्रमुख असा उल्लेख टाळला आहे.
दरम्यान, शिंदे गटाचे आमदार गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरे यांचा उल्लेख शिवसेना पक्षप्रमुख असा केला आहे. महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख मा.श्री. उद्धवजी बाळासाहेब ठाकरे आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, अशा शुभेच्छा गुलाबराव पाटील यांनी दिल्या आहेत. बंडखोर गटाचे आमदार उदय सामंत यांनीही पक्षप्रमुख उल्लेख टाळत उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या आहेत. महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय उद्धव साहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा! आपणास आनंदी आणि निरोगी दीर्घायुष्य लाभो, ही सदिच्छा, असं उदय सामंत यांनी म्हटलं आहे. तर, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही उद्धव ठाकरे यांचा पक्षप्रमुख हा उल्लेख टाळला आहे.
फेसबुकवर कमेंट्स बंद करण्यात आल्या असल्या तरी ट्विटरवर मात्र कमेंट्सचा भडीमार झाला आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील कलह कधीपर्यंत सुरु राहणार हे अद्याप सांगणे कठीण असले तरी दोन्ही गटाकडून एकमेकांवर टीका करणे मात्र सुरु आहे.