⁠ 
मंगळवार, एप्रिल 30, 2024

अबब.. खासदारांच्या फुकट रेल्वे प्रवासावर पाच वर्षात झाला’ एवढ्या’ कोटीचा खर्च

जळगाव लाईव्ह न्यूज । १ जुलै २०२२ । लोकसभेच्या वर्तमान खासदारांसह माजी खासदारांवर मोफत रेल्वे प्रवासाच्या सुविधेवर कोट्यवधींचा चुरडा केल्याचे समोर आले आहे. या मोफत रेल्वे सुविधेवर गेल्या पाच वर्षांत तब्बल 62 कोटी रुपये खर्च झाले आहेत. तुम्हाला आश्चर्य वाटेल, परंतू,ज्या कोरोना काळात देश लॉकडाऊनमध्ये होता, त्या काळातही खासदार महाशयांनी मोफत रेल्वे प्रवास केला आहे. या सुविधाचा खासदारांनी दणकावून फायदा उठवला आहे. माहिती अधिकार कायद्याचा (Right to Information) वापर करत ही माहिती उघड झाली आहे.

मोफत प्रवास
विद्यमान खासदार प्रथम श्रेणी वातानुकूलित वर्ग किंवा रेल्वेच्या एक्झिक्युटिव्ह क्लासमध्ये मोफत प्रवासासाठी पात्र आहेत. एवढे नाही तर, खासदारांचा जीवनसाथी पती अथवा पत्नी यांना काही अटींवर मोफत रेल्वे प्रवासाची सुविधा देण्यात येते. माजी खासदार देखील त्यांच्या सहकाऱ्यांसोबत AC-2 टियरमध्ये किंवा एकट्या AC-1 टियरमध्ये मोफत प्रवास करण्यास पात्र आहेत. मध्य प्रदेशातील आरटीआय कार्यकर्ते चंद्रशेखर गौर यांनी यासंदर्भात माहिती मागवली होती.

लोकसभा सचिवालयाने सांगितले की, त्यांना 2017-18 आणि 2021-22 मध्ये विद्यमान खासदारांच्या प्रवासाच्या बदल्यात रेल्वेकडून 35.21 कोटी रुपयांचे बिल मिळाले आहे. त्याचबरोबर माजी खासदारांच्या प्रवासाचे 26.82 कोटी रुपयांचे बिल प्राप्त झाले आहे. आरटीआयच्या उत्तरात असे म्हटले आहे की महामारीच्या उद्रेकात 2020-21 मध्ये खासदार आणि माजी खासदारांनी देखील रेल्वे पासचा वापर केला होता, त्यांची बिले अनुक्रमे 1.29 कोटी आणि 1.18 कोटी रुपये होती.

एकीकडे रेल्वेने ज्येष्ठ नागरिकांसह विविध श्रेणीतील प्रवाशांना दिलेल्या अनेक सवलतींवर बंदी घातली आहे, त्यामुळे काही विभाग संतप्त झाले आहेत. ज्येष्ठ नागरिकांच्या प्रवाशी भाड्यात देण्यात येणारी सूट बंद केल्याने सरकारला 7.31 कोटींचा फायदा झाला होता. मात्र दुसरीकडे खासदारांच्या मोफत प्रवासावर कोट्यवधींची उधळपट्टी करीत आहेत.